शिंदे गटाचा आरोप; उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत बेकायदा दुरुस्ती केली

125
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केल्यानंतर सर्वांचे लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडील सुनावणीकडे लागले. तिथे धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर युक्तिवाद सुरु झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. मंगळवार, १० जानेवारी रोजी आयोगासमोर शिंदे गटाचा युक्तिवाद संपला. युक्तिवादाच्या वेळी वकील जेठमलानी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेना पक्षाच्या घटनेत बेकायदा बदल केले, असे म्हटले.

काय म्हणाले वकील जेठमलानी? 

शिंदे गटाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहे, हे सिद्ध होत आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि संघटनात्मकदृष्टया पक्षावर आमचे संपूर्ण नियंत्रण आहे, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. तसेच शिवसेनेचा २०१८चा जो पक्ष कायद्यात केलेला बदल आहे, तो एक फ्रॉड आहे, असेही नमूद केले आहे. कारण १९९९साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा कायदा बनवला. आणि त्यात पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र २०१८ साली उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कायद्यात सुधारणा करून अशी निवडणूक घेण्यात येणार नाही, असे सुधारणा केली. शिवसेना पक्षप्रमुख पद वगळता कार्यकारिणीतील अन्य पदांसाठी निवडणूक घ्यायचीच नाही, असा तो बदल होता. पक्षप्रमुख कार्यकारिणीची निवड करेल हे चुकीचे आहे. त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच नाहीत, हे एक कारण आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक खूप नाराज होते, म्हणून आम्ही जुलै २०२२ मध्ये प्रस्ताव पारित करत या कारणामुळे आम्ही वेगळे होत आहोत, असा निर्णय घेतला, असे निवडणूक आयोगाला सांगितल्याचे वकील महेश जेठमलानी म्हणाले.
 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.