शिंदे गटातील आमदारांच्या साथीने शिवसेना-भाजपाचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बऱ्याच आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी लोकप्रतिनिधींची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी भाजपा नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील उत्तर भारतीय आमदाराला मंत्री बनवण्याच्या विचारात आहे. मात्र त्यासाठी कोणाच्या गळ्यात मंत्रीमंडळाची माळ पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रभाव पाडू शकणा-या चेहऱ्याचा शोध सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय मते निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी कॉंग्रेससह शिवसेना आणि भाजपा हेदेखील उत्तर भारतीय चेहरा समोर आणण्याची व्यूहरचना करत आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यास येत्या सहा महिन्यांत महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची तयारी राजकीय पक्ष आतापासून करत आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात एका उत्तर भारतीय चेहऱ्याला संधी मिळणे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात प्रभाव पाडू शकेल, अशा चेहऱ्याचा शोध सध्या भाजपाकडून घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समाजात मान्यता असलेल्या काही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
कुणाला मिळणार संधी?
माजी मंत्री कृपाशंकर सिंह आणि राजहंस सिंह या शर्यतीत आघाडीवर आहेत. शिवाय माजी मंत्री विद्या ठाकूर यांचेही नाव चर्चेत आहे. कृपाशंकर यांना संधी मिळाल्यास त्यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आणावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी त्यांना संधी देता येऊ शकते. दुसरीकडे, कृपाशंकर हेच मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे राजहंस सिंह सांगत असले, तरी गेल्या काही दिवसांत त्यांचे सागर बंगल्यावर येणे-जाणे वाढल्यामुळे देवेंद्रांची ‘कृपा’ त्यांच्यावर झाल्यास नवल वाटायला नको. विद्या ठाकूर यांचेही नाव चर्चेत असले, तरी त्या उत्तर भारतीय मतदारांवर कितपत प्रभाव पाडू शकतील, याबाबत पक्ष नेतृत्वास शंका आहे. या सर्व नावांच्या पलिकडे जाऊन मोहीत कंबोज यांना संधी दिली जावी का, याबाबतही भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी शिवसेनेला अंगावर घेतले आणि पक्षाच्या गुप्त मोहिमा यशस्वी करण्यास केलेले सहकार्य विचारात घेता कंबोज यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Join Our WhatsApp Community