स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकणे महाविकास आघाडीच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील विधानपरिषदेच्या जागा काबिज करण्याचे नियोजन शिंदे-फडणवीसांकडून केले जात असून, पालकमंत्र्यावर त्याची सर्वस्वी जबाबदारी देण्यात आली आहे.
( हेही वाचा : गडचिरोलीतील आरमोरी भागांत चार दिवसांत दुस-यांदा वाघाचा हल्ला, एक व्यक्ती ठार)
पुणे, सातारा-सांगली, नांदेड, यवतमाळ, जळगाव आणि भंडारा या स्थानिक स्वराज्य प्राधिकारी संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या सहा सदस्यांची मुदत येत्या पाच डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवूत या रिक्त होणाऱ्या जागांसंदर्भात काही माहिती मागविली आहे. मात्र एकीकडे आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या सहा जागांवरील निवडणूक प्रक्रियाही लांबणार असल्याचे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केले.
६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीकडे
- स्थानिक स्वराज्य प्राधिकारी संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या ज्या सहा सदस्यांची मुदत येत्या पाच डिसेंबर २०२२ रोजी संपणार आहे, त्यातील चार सदस्य हे महाविकास आघाडीचे आहेत. पुण्याची जागा राष्ट्रवादी, सातारा-सांगली आणि नांदेड कॉंग्रेस, यवतमाळची जागा शिवसेनेकडे आहे. जळगाव आणि भंडारा गोंदियात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
- स्थानिक समिकरणांची जुळवणी केल्यास प्राप्त परिस्थितीत महाविकास आघाडीकडील किमान तीन जागा भाजपा-शिंदे गटाला मिळू शकतात. त्यात यवतमाळ, पुणे आणि नांदेडचा समावेश आहे. शिंदे-फडणवीसांनी त्यादृष्टीने नियोजन सुरू केले असून, पालकमंत्र्यांवर त्याची सर्वस्वी जबाबदारी देण्यात आली आहे.
- त्यानुसार पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असून, देवेंद्र फडणवीस स्वतः या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यवतमाळ संजय राठोडांकडे देण्यात आले असून, सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.
- नांदेडच्या पालकमंत्री पदाची अतिरिक्त जबाबदारी गिरिश महाजन यांच्याकडे देण्यामागे हिच रणनीती आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाणांशी सलगीचे संबंध राखून आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकणे महाविकास आघाडीच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.
५ डिसेंबरला मुदत संपणाऱ्या जागा
१) पुणे – अनिल शिवाजीराव भोसले (राष्ट्रवादी)
२) सातारा-सांगली – मोहनराव श्रीपती कदम (कॉंग्रेस)
३) नांदेड – अमरनाथ अनंतराव राजूरकर (कॉंग्रेस)
४) यवतमाळ – दुष्यंत सतीश चतुर्वेदी (शिवसेना)
५) जळगाव – चंदुभाई विश्रामभाई पटेल (भाजपा)
६) भंडारा-गोंदिया – डॉ. परिणय फुके (भाजपा)