माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, सगळे सांगणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

आज मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात आम्हाला गद्दार म्हणता, तुम्ही तर सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले मग गद्दार कोण? गद्दारी आमच्या रक्तात नाही. ये पब्लिक है सब जानती है, गद्दार कोण खुद्दार कोण? जनता जाणते. आरोप प्रत्यारोप करत राहू द्या, दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एका तरी गट प्रमुखाला रोजगार मिळाला का? त्यांना मुंबईत येणे-जाणेही परवडत नव्हते. कधी त्यांचा  विचार केला का? मी नगरविकास खात्यातून १-२ कोटी निधी दिला आणि काम करा म्हणून सांगितले. मी देण्याचे काम करतो, काही जण फक्त घेण्याचे काम करतात. मी देनेवाला आहे म्हणून मी मुख्यमंत्री बनलो. आता आम्हाला ‘खोके’ बोलत आहात, वेळ आल्यावर सगळे सांगेन.  माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, ते मी दिल्लीत नाही महाराष्ट्रात सांगणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धमकी दिली.

बुधवार, २१ सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे दिल्लीत बोलत होते. यावेळी शिंदे गटाच्या विविध राज्यातील नव्याने नियुक्त केलेल्या राज्य प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

(हेही वाचा ‘आयुष्यातील पहिली निवडणूक समजून लढा’, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन)

शिवसेना प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नाही 

 शिवसेना पक्ष प्रा. लि. कंपनी नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना तुम्ही नोकर समजत असला तर ते सहन करणार नाही. दिवस-रात्र शिवसैनिकांनी मेहनत करून शिवसेना उभी केली आहे. त्यामुळे ही तुमची खासगी कंपनी आहे असे म्हणून शकत नाही ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्ही सहाव्या क्रंमाकांवर गेला, तुम्हाला जनतेने नाकारले. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, ही तुमची चूक होती. कालपर्यंत पदाधिकारी, नेते यांना कधी फोन आले नव्हते, आता फोनवर फोन येतात, हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी अच्छे दिन आहेत. मुंबईत गट प्रमुखांचा मेळावा सुरु आहे, अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण झाली आहे, आधी त्यांना ना वर्षावर प्रवेश होता ना मातोश्रीत. आम्ही उठाव केला आणि गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आम्ही मिंधे गट नाही तर बाळासाहेबांचे खंदे समर्थक 

आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत. दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही सत्तेसाठी मिंधेपणा केला, आम्हाला आस्मान दाखवणार म्हणालात, तीन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला आस्मान दाखवले आहे. आम्हाला मिरचीचा ठेचा देणार, अहो आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले आहे. महाविकास आघाडीला खाली खेचणे शक्य नव्हते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, मग आम्ही तुम्हाला बापाचे विचार चोरणारी टोळी म्हणायचे का?, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आजचा बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी गट प्रमुखांच्या मेळाव्यात जी टीका केली त्याला सडकून प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा अहेर, मेळाव्यात उपस्थित राहून केले शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन)

देशात बाळासाहेबांची शिवसेना वाढेल! 

शिवसेनेत २०-२० वर्षे विविध राज्यांत शिवसैनिक काम करत होते, मात्र त्यांच्याशी कसा व्यवहार होत होता हे आज त्यांनी सांगितले. त्यांना पक्ष नेतृत्वाची साधी भेटही मिळत नव्हती, त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे कार्य केले आहे. हा उठाव केवळ महाराष्ट्रातच झाला नाही. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा उठाव केला नाही. सत्तेत असताना आम्ही सत्ता सोडली आहे. जगात हे निराळे उदाहरण होते. जर भाजपसोबत आम्ही निवडणूक लढवली, बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतदारांना मते मागितली, लोकांनी आमची हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलीही. युतीचे सरकार येणार असे जनतेला वाटत होते. पण काय झाले. ज्यांच्या विरोधात आम्ही अनेक वर्षे लढलो त्या दोन्ही काँग्रेस सॊबत सरकार स्थापन केले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, जेव्हा दोन्ही काँग्रेसला जवळ करण्याची वेळ येईल तेव्हा शिवसेना बंद करेन. मग २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजपाला दूर ठेवून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन का केली? तेव्हाही विरोध झाला पण पक्ष शिस्तीमुळे आम्ही गप्प बसलो. पण अडीच वर्षांत आमचा मुख्यमंत्री असूनही आमच्या शिवसैनिकांवर तडीपारी, जेल मिळत होत्या. मी शक्य तितके मदत करत राहिलो. ज्यांची जबाबदारी होती, ते मदत करत नव्हते. आमचा नेता मुख्यमंत्री पदावर असतानाही आमच्याच लोकांवर अन्याय होत होता, अन्यायाची परिसीमा गाठली गेली. त्यामुळे आम्ही उठाव केला. आम्ही जर चुकीची भूमिका घेतली असती तर लाखो लोक आमच्या मागे उभे राहिले नसते. बाळासाहेबांची कधीच सत्तेसाठी भूमिका बदलली नव्हती. आता संपूर्ण देशात बाळासाहेबांची शिवसेना पुढे वाढेल. सर्व राज्यांत भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आमचे राज्य प्रमुख करतील, असे सांगत मी काम करणारा कार्यकर्ता आहे, घरात बसणार नाही. त्यामुळे अनेक जण घाबरले आहेत आणि काम करू लागले आहेत. मी गणपती दर्शनासाठी फिरलो त्यामुळे सगळे जण फिरायला लागले. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट बोलण्यासाठी तुम्ही कचरत आहात, इतके निधर्मी झालात का?  मी स्वतः समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले, अशी आठवणी मुख्यमंत्री शिंदे यांनी करून दिली.

(हेही वाचा ‘आम्हाला जमीन दाखवाल तर तुम्हाला असमान दाखवू’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here