बंड करण्याच्या आधी २० आमदार विचारायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या, दरवाजे उघडे ठेवा म्हणाले. दरवाजे उघडेच ठेवा सगळे निघून जातील. फक्त तुम्ही दोघेच रहाल. हम दो हमारे दो, माझे कुटुंब माझी जबाबदारी, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे गोळीबार मैदान येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टोला हाणला.
जेव्हा डोक्यात सत्तेचा हव्यास जातो, तेव्हा त्याला काही दिसत नाही. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री नाही. जर राज्यातील जनतेला रोजगार मिळणार असेल तर मी वारंवार दिल्लीत जाईन मला लाज वाटत नाही. हे सरकार सायलेंट मोडवर नाही तर अलर्ट मोडवर आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा कुणाचे हॉटेल सिंगापूर, लंडन, अमेरिकेत आहे, सगळे एक दिवस महाराष्ट्रासमोर आणणार; रामदास कदमांचा इशारा)
महाराष्ट्रात सर्कशीप्रमाणे सभा होणार
ही सभा विराट आहे, आलेले भगवे वादळ लोकांना दाखवा. काही लोक ही सभा पाहत असतील, सभेतील गर्दीची तुलना करण्यासाठी आम्ही आलो नाही, कोकण लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वा. सावरकर यांची कर्मभूमी, परशुरामाने पावन झालेली भूमी आहे. या मैदानात बाळासाहेबांची सभा झाली होती, गेल्या आठवड्यात याच मैदानात आपटीबार येऊन गेला. मी त्याला उत्तर द्यायला आलो नाही, कारण तोच तो थयथयाट, आदळआपट, मुंबईतही तेच सुरु आहे. त्याला उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातही त्यांचे सर्कशीप्रमाणे सभा होणार आहेत. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांच्या विचारावर या लोकांनी प्रेम केले आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. आमचा जो लढा, क्रांती केली त्यात कोकणातील आमदारांचा मोठा सहभाग आहे. खांद्याला खांदा लावून ते सोबती होते. शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ यांनी का पाठिंबा दिला यांचा विचार करण्यासारखी आहे. कोकणी माणूस आंब्यासारखा गोड असतो, शब्दाला जगणार आहे, पण सत्तेसाठी आपला पक्ष दोन्ही काँग्रेसकडे घाण ठेवला, तो आम्ही सोडवला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांविरोधात कट रचत होते; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)