राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी राज्यात युतीचे सरकार स्थापन केले, तेव्हापासून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माविआ सरकारने घेतलेल्या निर्णय आणि कामांना स्थगिती आणण्यास सुरुवात केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा पवार यांनी दिला.
काय म्हणाले अजित पवार?
शिंदे सरकारकडून मविआ सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येत असलेल्या स्थगितीवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत काम केले आहे. त्यांनीच मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे, असे करण्याचे काहीच कारण नव्हते. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकारे येत-जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत. त्याचा विचार करायचा की नाही, असे अजित पवार म्हणाले. २०२१ पर्यंतची कामे बंद करणे योग्य नाही. विकासाची कामे होती. महाराष्ट्रातील कामे होती, कुणाच्या घरादारातील कामे नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू य़ेथील नियोजित स्मारकाचा निधीही स्थगितीमुळे रखडला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा निधीही अडकला आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असे खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्रात झाले नव्हते. हे तातडीने थांबवा, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
(हेही वाचा मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडण्यामागे काय आहेत कारणे आणि कोण आहेत जबाबदार?)
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
यावेळी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरूनही अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे. आपणच सरकार चालवतोय हे बरं आहे, बाकीचा कुणाचा त्रास नाही, यामुळे त्यांचे चालले आहे की आणखी काही कारणाने चालले, लोकशाहीत असे वागून चालत नाही. कारण असे प्रसंग येतात तेव्हा पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची भूमिका ठरते, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community