राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-भाजप सरकारने सोमवारी झालेला विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारच्या सत्तेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
शिंदे-भाजप सरकारचा विजय
सोमवारी सकाळी 11 वाजता विधान भवनात बहुमत चाचणीला सुरुवात झाली. यामध्ये शिंदे-भाजप आघाडीने 164 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकार बहुमत चाचणीत देखील यशस्वी होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीत देखील शिंदे-भाजप सरकारने विजय संपादन केला आहे.
असे झाले मतदान
बहुमताच्या चाचणीत शिंदे-भाजप आघाडीने 164 मतं मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ 99 मतं पडली आहेत. यात एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. यामुळे शिंदे-भाजप सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.
केवळ औपचारिकता
रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना 164 तर महाविकास आघाडीला 107 मतं मिळाली होती. या निकालामुळे बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता राहिली होती. शिंदे-भाजप आघाडीचा विजय हा निश्चित मानला जात होता. या निवडणुकीत एकूण 287 आमदारांपैकी 271 आमदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या दोन, तर एमआयएमच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली.
Join Our WhatsApp Community