‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा नक्की भरवसा कुणावर? महापालिकेचे ज्ञान असलेल्यांना सारले बाजुला

180

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या संघटनात्मक जबाबदारीतून ज्यांनी तीन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले होते आणि शिवसेनेच्या संघटनात्मक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला त्या आमदार सदा सरवणकर यांच्यासह चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणाऱ्या यशवंत जाधव यांनाही डावलण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला नक्की कुणावर भरवसा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिका क्षेत्राची संघटनात्मक कार्याची जबाबदारी ही खासदार, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार, उपनेते राहुल शेवाळे, उपनेत्या, प्रवक्ता शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामिडी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली.

(हेही वाचा मी कुठं सांगितले माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला)

निर्णय अचंबित करणारे

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने संघटनात्मक जबाबदारी सोपवलेल्या यादीमध्ये खासदार गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे यांच्यासह शीतल म्हात्रे यांची नावे योग्य वाटत असली, तरी शिवसेनेचे विभाग व आमदार राहिलेल्या सदा सरवणकर यांना पक्षाच्या संघटनात्मक वाढीपासून बाजुला ठेवले आहे. सरवणकर हे नगरसेवक राहिलेले आहेत आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही दोन वेळा भूषवले आहे. ते शिवसेनेचे विभागप्रमुख राहिले असून दादर, धारावी, वडाळा या तीन विधानसभेची पक्षाची संघटनात्मक बाजू त्यांनी मजबूत केली आहे. परंतु या संघटनात्मक पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना त्यांची मदत घेण्याची गरज भासत नाही. याबरोबरच सन २०१८-१९ पासून सन २०२२पर्यंत स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांनाही पक्षाने संघटनात्मक बाबींपासून दूर ठेवले आहे. या दोन्ही नेत्यांना बाजुला ठेवून माजी नगरसेविका असलेल्या कामिनी शेवाळे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याने अनेक वर्षे संघटनात्मक पक्षाला मजबूत करणाऱ्या नेत्यांपेक्षा शेवाळे यांच्यावर विश्वास कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशा मामिडी या अभ्यासू असून शिवसेनेला त्यांची किंमत कळाली नाही, परंतु बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने त्यांची दखल घेतल्याचे पहायला मिळत आहे.

ठाण्यात शिंदे मजबूत; पण मुंबईत नाही

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुंबईतील मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे आदी आमदार असले तरी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बाबींपासून दूर ठेवल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची नक्की भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये असले तरी मुंबईमध्ये त्यांची शक्ती दिसून येत नाही. परंतु मुंबईत शिंदे गटाला जास्त ताकद लावण्याची गरज असून मुंबई महापालिकेचे ज्ञान असलेल्या नेत्यांना बाजुला ठेवले जात असल्याने नक्की पक्षाला मजबूत करायचे आहे की मर्जीतील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावून त्यांना खूश केले जात आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.