शिंदे गटाच्या जागोजागी उभ्या होणार प्रती शाखा

92
एका बाजूला शिंदे गट दादर येथे शिवसेना भवनाच्या बाजूलाच स्वतःचे मुख्यालय उभारणार आहे, तसेच मुंबई, महामुंबईसह राज्यभर कार्यालये उभारून एकप्रकारे प्रति शाखा उभारणार आहे, अशी घोषणाच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी केली.

मुख्यालयात मुख्यमंत्री शिंदे सर्वसामान्यांना भेटणार 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेवर दावा ठोकला आहे. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे मात्र शिंदे गटाने समांतर शिवसेना स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी दादर येथे जिथे शिवसेना भवन आहे, त्याच्याच जवळ शिंदे गट मुख्यालय उभारणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बसून नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली. या कार्यालयाची जागा निश्चित झाली आहे, येत्या १५ दिवसांत हे कार्यालय सुरु होणार आहे. तसेच मुंबई, महामुंबईसह राज्यभर ठिकठिकाणी शिंदे गटाची कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे, असेही आमदार सरवणकर म्हणाले. दरम्यान शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिराच्या समान आहे, मात्र आज आम्ही तिथे बसून नागरिकांच्या समस्या सोडवू शकत नाही, त्यामुळे शिंदे गटाने हा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.