सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करत जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची स्पर्धाच लावली आहे. असे असतानाच या दसरा मेळाव्याच्या आधी शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिण्यात आले आहे.
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात करण्यात आला आहे. साहेब तुम्ही गेल्यानंतर शिवसेनेचा ढाण्या वाघ मॅटिनी शोच्या सर्कशीतला वाघ झाला होता, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.
तुम्हाला दिलेल्या वचनामुळे शांत राहिलो
साहेब तुम्ही गेलात आणि आपल्या शिवसेनेच्या वाघाला कोण्या शिका-याने गुंगीचं औषध दिलं. या गुंगीच्या इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला. शिवसेनेचा कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. साहेब आम्हाला सगळं दिसत होतं पण उद्धव साहेबांना आणि आदित्यला सांभाळू या तुम्हाला दिलेल्या वचनामुळेच आम्ही शांत होतो. तुम्हाला ज्या विचारांची चीड होती तेच विचार तत्व म्हणून आपल्या संघटनेत येऊ लागले. अनेकवेळा याबद्दल बोलायचा प्रयत्न केला पण आमचा आवाजच दाबला जाऊ लागला.
शिवसैनिकांनी किती सहन करायचं?
तुम्ही गेल्यावर शिवसेना नावाचा ढाण्या वाघ बघताबघता मॅटिनीशोच्या सर्कशीतला वाघ झाला. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या हक्काच्या जागा नाकारल्या जाऊ लागल्या. शिवसेनेवर पदोपदी अन्याय होऊ लागला. कित्येक शिवसैनिकांवर आपल्याच मित्रपक्षांकडून दबाव येऊ लागला. शिवसैनिकांनी सहन तरी किती करायचं? तुम्हीच सांगा, असा सवालही पत्रातून करण्यात आला आहे.
शिवसेना भरकटू लागली…
रात्र जागून पोस्टर्स लावणा-या, शिबिरं घेणा-या,मराठी आणि हिंदू अस्मिता टिकवण्यासाठी झटताना पोलिस केसेस आणि दांडेही अंगावर घेणा-या आम्हा कार्यकर्त्यांच्या एकाही शब्दाला किंमत उरली नाही. हौशा-गौशांच्या नावापुढं बिरुदं लागून संघटनेत त्यांचं वजन वाढू लागलं आणि आपली संघटना भरकटू लागली. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या,जुन्या-जाणत्या शिवसेना नेत्यांनाही राजकारणातून बेदखल केलं गेलं. मग साहेबांच्या भेटीशिवाय परतण्याची वेळ आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांवर आली यात काय नवल? साहेब तुम्ही होतात तेव्हा मातोश्री म्हणजे आपुलकी हे समीकरण होतं आणि आता…,असं म्हणत या पत्रातून सामान्य शिवसैनिकांची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community