स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकः भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंना स्थान नाही! राणेंनी व्यक्त केले आश्चर्य

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महत्वाच्या खात्याचे मंत्री असून देखील त्यांच्या नावाचा समावेश का नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

एकनाथ शिंदे… राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे पहिल्या फळीतील नेते आहेत. म्हणूनच शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून देखील पाहिले जाते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेवरच त्यांचे नाव नसल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन ३१ मार्च रोजी संध्याकाळी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या नियंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांची नावे आहेत. पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महत्वाच्या खात्याचे मंत्री असून देखील त्यांच्या नावाचा समावेश का नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

नितेश राणेंनी डिवचले

यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसे नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य!!, असे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे.

(हेही वाचाः बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याला राज आणि फडणवीसांना निमंत्रणच नाही!)

बाळासाहेब मनाने राजा माणूस! पण त्यांच्यानंतर…

तसेच ज्या स्मारकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले त्यांना सुद्धा या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे एक नाराजीचा सूर भाजपच्या नेत्यांकडून आळवला जात आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत याबाबत टीका केली आहे. आज मा. बाळासाहेब असते तर त्यांनी पहिले निमंत्रण देवेंद्र फडणवीस यांना दिले असते. बाळासाहेब मनाने राजा माणूस होते. पण त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मनं खूप लहान झाली आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीस-राज ठाकरेंनाही निमंत्रण नाही

एकीकडे स्मारक भूमिपूजन नियंत्रणाच्या कार्यक्रम पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव नसताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम हे राजसाहेबच करत आहेत, हीच मराठी माणसाची भावना आहे आणि तीच महत्वाची आहे. बाकी भूमिपूजन कोण करतंय हे महत्वाचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

दरेकर यांची प्रतिक्रिया

तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भूमिपूजन सोहळ्याला विरोधकांना न बोलावल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवे होते. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते. या प्रसंगीही सरकारने तसे करायला हवे होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. त्यांनी लागणाऱ्या परवानग्या मिळवून दिल्या होत्या. त्यांना बोलवायला हवे होते. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here