‘वर्षा’चे कधी होणार ‘एकनाथ’?

134

मुख्यमंत्री पदी विराजमान होऊन २२ दिवस लोटले, तरी एकनाथ शिंदे अद्याप मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांची उठबस करताना कर्मचारी आणि सुरक्षा पुरवताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही गर्दी अडसर ठरू लागली आहे.

( हेही वाचा : राज्यातील ११५ नगरपरिषदा आणि ९ नगरपंचायतींसाठी नव्याने सोडत काढणार)

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामुळे ‘वर्षा’ हे राज्यातील सत्ताकारणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. मात्र, एकनाथ शिंदे आजही ‘नंदनवन’ आणि ‘अग्रदूत’ या बंगल्यावरून कारभार पाहत आहेत. दांडगा जनसंपर्क असलेल्या शिंदेंना भेटण्यासाठी दररोज शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. शिवाय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदारांची ये-जाही वाढली आहे. त्यामुळे या सर्वांची उठबस करण्यास जागा कमी पडत असल्याने बंगल्यांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे.

दुसरीकडे, त्यांना भेटायला येणारे आमदार आणि कार्यकर्ते सुरक्षा व्यवस्थेला जुमानत नाहीत. एखाद्याला अडवले की, ते थेट मुख्यमंत्र्यांच्या माणसांना फोन लावून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांही त्रस्त आहेत. मागच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ बंगला देण्यात आला होता. तो आणि त्याच्या शेजारी असलेला ‘अग्रदूत’ बंगलाही सध्या त्यांच्याकडे आहे. परंतु, वर्षा निवासस्थानच्या भोवताली असलेली सुरक्षा या बंगल्यांच्या आजुबाजूला नाही. शिवाय दोन्ही बंगल्यांचा आकारही वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कधी वर्षावर रहायला जाणार, याकडे त्यांच्या ताफ्यातील कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांना नियमानुसार झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्षा बंगल्यावर असलेल्या उपाययोजना अग्रदूत वा नंदनवन बंगल्यावर नाहीत. पोलिसांनी तेथे कडेकोटे बंदोबस्त ठेवला असला, तरी तेथे वर्षासारखी सुरक्षा व्यवस्था तैनात करणे शक्य नाही. एकनाथ शिंदे यांना याआधीच नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेविषयी पोलीस अधिक सतर्क आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.