धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिंदेंनी दिले आदेश

पुनर्विकासासाठी शासनाकडून नक्की काय उपाययोजना करता येतील किंवा सद्यस्थितीत केलेल्या उपाययोजनांमध्ये नक्की काय बदल करता येतील, ते सुचवावे.

185

एमएमआर क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी, महापालिकांनी क्लस्टर आराखडा तयार करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांना दिले आहेत. या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नक्की काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

काय आहेत निर्देश?

एमएमआर क्षेत्रातील सर्वच मनपा आयुक्तांनी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडण्यामागे मालक-भाडेकरू यांच्यातील वाद, कायदेशीर प्रक्रियेत स्थगिती मिळाल्याने रखडलेला पुनर्विकास आणि पुनर्वसनातील अडचणी कारणीभूत असल्याचे सांगितले. यावर एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महापालिकेला आपल्या हद्दीत क्लस्टर योजना राबवण्याचा विचार करण्याचे निर्देश शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना दिले. त्यासोबत ज्या इमारती क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊ शकत नाहीत, त्याच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून नक्की काय उपाययोजना करता येतील किंवा सद्यस्थितीत केलेल्या उपाययोजनांमध्ये नक्की काय बदल करता येतील, ते सुचवण्याचे निर्देश देखील शिंदे यांनी संबंधित पालिका आयुक्तांना दिले.

(हेही वाचाः यापुढे महामुंबईत इमारत कोसळली तर गंभीर परिणाम होतील! उच्च न्यायालयाचा इशारा )

तातडीने मदत करणारे पथक तयार करावे

प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा प्रश्न भेडसावत असल्याने अशा इमरतीत राहणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रत्येक मनपा हद्दीत ट्रान्झिट कॅम्प उभे करावेत. त्यासाठी निधीची तरतूद करावी, असेही  शिंदे यांनी सांगितले. धोकादायक इमारत कोसळल्यास तातडीने मदत करण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात येते. या पथकाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने टीडीआरएफ पथक तयार केले आहे. या पथकाने उल्हासनगर इमारत दुर्घटना आणि महाड इमारत दुर्घटनेवेळी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे पत्येक महापालिकेने असे तातडीने मदत देऊ शकणारे पथक निर्माण करावे, जेणेकरुन अशी दुर्घटना घडल्यास वेळ न घालवता तातडीने मदतकार्य सुरू करुन, जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.