एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. यानुसार बंडखोर आमदारांना आपली भूमिका मांडण्याची मुदत न्यायालयाकडून वाढवून देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. यावरुनच आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. हा बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचे
ट्वीट एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
न्यायालयाचा निर्णय
16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या नोटीसविरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत आपली भूमिका मांडण्यासाठी शिंदे गटाकडून मुदत वाढवून मागण्यात आली होती. त्यांच्या या मागणीला न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून शिंदे गटाला 12 जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपिठाकडून सुनावणी पार पडली. अपात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु आणि गटनेते अजय चौधरी आणि केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community