एकनाथ शिंदेंचे पुढील लक्ष्य, शिवसेना प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य?

131
शिवसेनेतील ४० आमदार बाहेर काढून भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेत आणखी धक्कातंत्र वापरण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेला लक्ष्य केले आहे. या सभेतील एकूण २७२ सदस्य संख्या आहे, त्यातील दोन तृतीयांश सदस्य आपल्या गटात वळवण्याचे धोरण केले आहे. सध्या उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या विरोधात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयानेही यासंबंधी दोन्ही बाजूच्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेवर हक्क मिळवण्यासाठी हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

पक्षात उभी फूट पाडण्यासाठी प्रयत्न? 

शिवसेना संघटनेत सर्वात महत्वाच्या मानल्या गेलेल्या प्रतिनिधी सभेत २८२ सदस्य संख्या आहे. एकनाथ शिंदे आता त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजे १८८ सदस्य फोडण्याच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांना यामध्ये यश आल्यास शिवसेना आणि उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने अडचणीत येतील. पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असे होत नाही. त्यासाठी संघटनेतही उभी फूट पडणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य आपल्या बाजूला वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रचलेल्या मनसुब्याप्रमाणे संपूर्ण शिवसेना पक्षावर त्यांना ताबा मिळवता येऊ शकतो.

काय आहे प्रतिनिधी सभा? 

शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत. शिवसेनेच्या २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पडद्यामागे प्रचंड प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. तसे घडल्यास संपूर्ण शिवसेना पक्षच ठाकरे कुटुंबियांच्या निसटण्याची दाट शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.