Devendra Fadnavis : शिंदे आजारी, आमदार देवेंद्रद्वारी; सत्ताकेंद्राचा नवा पत्ता ‘सागर बंगला’

निकालानंतर भाजपा आणि शिंदे गटात आधी मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर खातेवाटपावरून रस्सीखेच रंगली.

143
महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तारीख जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी आजारपणाचं कारण देत आमदार-खासदारांच्या बैठका रद्द केल्या. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) सरकारी निवासस्थान असलेल्या सागरवर धाव घेत फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगलीय. याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं, अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिलं जाणार नाही. म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. यामुळे यामध्ये आपले तर नाव नाही ना या धास्तीने काही माजी मंत्री तर नव्यांना संधी दिली जाणार असल्याने काही शिंदे गटाचे आमदार सागर बंगल्यावर भेटीगाठी घेताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळेच आता राज्यातील सत्तेचं केंद्र वर्षा बंगला नसून सागर बंगला झाला आहे.

भेटीगाठी घेणारे माजी मंत्री आणि आमदार कोण? 

उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर, राजेंद्र गावित, तानाजी सावंत, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, सुहास कांदे, गुलाबराव पाटील ही नावे समोर आली आहेत. तर काहींनी अंधाऱ्या रात्री देखील भेटीगाठी घेतल्याचे सूत्रांकडून कळते.
निकालानंतर भाजपा आणि शिंदे गटात आधी मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतर खातेवाटपावरून रस्सीखेच रंगली. त्यातच शिंदेंकडून आमदारांच्या बैठका रद्द करण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार हवालदिल झाल्याची चर्चा रंगली. मात्र शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी फडणवीसांची भेट घेतली की शिंदेंचा निरोप घेऊन तिढ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.