राज्याच्या राजकरणात सध्या एकामागोमाग एक मोठ्या घटना घडत आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी, २९ जून रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे आणि देशाचेही एकनाथ शिंदे यांच्याकडे लागले होते. गुरुवारी, ३० जून रोजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. मात्र यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील सर्व नेते नॉट रिचेबल बनले आहेत.
ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते गायब
शिवसेनेमधून ४० आमदार घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाचे काय होणार हा विषय सर्वत्र चर्चेला येत होता. जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानंतर या चाचणीला उपस्थित राहण्यासाठी अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार असे ५० जण गुवाहटी येथून गोवा येथे आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे ७ दिवस मौनात?
मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र तेव्हापासून शिवसेनेचे सर्व प्रवक्ते, नेते नॉट रिचेबल झाले. कुणीही एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले नाही. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, मनीषा कायंदे, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना संपर्क केला, तेव्हा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, अशा प्रकारे शिवसेनेचे नेते नॉट रिचेबल झाले आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही पुढील ७ दिवस कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणार नाही, असे ठरवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
Join Our WhatsApp Community