आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकरही नॉट रिचेबल

83

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ३५ ते ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेच्या संपर्कातील काही आमदार गुवाहाटी गाठत शिंदे यांच्या गटात सामील होऊ लागले आहेत. आता त्या आमदारांपाठोपाठ शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या दादर-माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर आणि आमदार मंगेश कुडाळकर हेही नॉटरिचेबल आहेत.

सरवणकर, कुडाळकर गुवाहटीकडे

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री निवासस्थानी यायला निघाल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक शिवसैनिक रस्तोरस्ती उभे होते. परंतु दादर माहीमचे सदा सरवणकर हे कुठेच दिसले नाही. पण त्यांचा फोन अनेकांना नॉट रिचेबल लागत असल्याने नक्की सरवणकर कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सुमारे ४० आमदार बंडखोरी करत पक्षातून बाहेर पडले. हे सर्व आमदार गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये आहेत. शिंदे यांनी आपला गट स्थापन करत त्या आमदारांच्या गटाचे पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड केली आहे. शिंदे यांना दोन-तृतीयांश संख्या आवश्यक असल्याने त्यांनी आता सेनेच्या संपर्कात असलेल्या असलेल्या आणखी चार आमदारांना आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी ठरले. आमदार गुलाबराव पाटील, योगेश कदम यांच्यासह ४ आमदार हे शिंदे यांच्या गटात सामील झालेले आहेत. संध्याकाळी हे सर्व गुवाहाटीला पोहोचले आहेत. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह घेऊन जनतेला आणि बंडखोरांना भावनिक आवाहन केले. त्यानंतर त्यांनी रात्री वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले आणि वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी यायला निघाले.

माहीममध्ये दोघेही दिसले नाहीत

त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आणि यांचे स्वागत करण्यासाठी मलबार हिल पासून ते वांद्रे पर्यंतच्या प्रत्येक रस्त्यावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिकांची गर्दी होती. या गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेचा यांचा ताफा पुढे निघत होता. दादर माहीममध्ये आल्यावर तिथून पुढे जात असताना या विभागाचे विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर आणि कुडाळकर हे कुठेच दिसले नाही. दोघांचा फोनही नॉटरिचेबल लागल्याने शिवसैनिकांच्या मनातील पाल चुकचुकली. सरवणकर हे सुद्धा येथील अंतर्गत राजकारणामुळे त्रस्त झाल्याने शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला आणि पाठिंबा द्यायला तेच कुठेच न दिसल्याने आता त्यांच्याविषयीची नॉटरिचेबल की चर्चा दादर माहिममध्ये रंगू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.