शिवसेनेतील ३५ आमदारांना घेऊन महाराष्ट्र बाहेर गेलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै पर्यंत अपात्रतेची कारवाईपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आता महाविकास आघाडीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता भाजपाने भविष्यातील संभाव्य राजकीय घडामोडींचा अंदाज घेत सत्ता स्थापनेच्या शक्यतांवर विचारविनिमय केला आहे. त्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे दुसऱ्या बाजूला सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
फडणवीस दिल्लीत रवाना
सोमवारी, २७ जून रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यामध्ये भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर मंगळवारी, २८ जून रोजी देवेंद्र फडणवीस विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडमोडींवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील ४८ तासांत काय घडणार?; यावर आता उत्सुकता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत चर्चा केली पाहिजे. ते कुठे दुखावले गेले असतील तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत आणि भाजपानेही त्याचा विचार केला पाहिजे, असे मत शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community