शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार घेऊन ते महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पर्यायाने ठाकरे सरकार हे अल्पमतात आले आहे. त्यामुळे भाजपाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती केली. त्यानुसार राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी, ३० जून रोजी बहुमत चाचणी करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी, २९ जून रोजीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर बहुमत चाचणीसाठीचे विशेष अधिवेशन होणार नाही, मात्र तरीही भाजपाचे सरकार येईल, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
…तर राज्यपाल भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करेल
आजवरच्या इतिहासात ज्या ज्या ठिकाणी सरकारे अल्पमतात आले आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्या त्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीत पराभव होऊन नाच्चकी टाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. त्यातील शिवसेनेतील ४० आमदार फुटल्यामुळे शिवसेनेमुळे हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा या बहुमत चाचणीच्या वेळी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे जाऊन पराभूत होण्याऐवजी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, असे जर झाले तर आपोआप हे सरकार कोसळून जाईल. सरकार कोसळल्यावर बहुमत चाचणी घेण्याचा विषयच उरणार नाही. त्यानंतर राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला पुन्हा सरकारला स्थापन करण्यासाठी बोलावतील, त्यानंतर भाजपा बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करेल, असे भाजपा नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा बहुमत चाचणीच्या आधीच महाविकास आघाडीत फूट?)
Join Our WhatsApp Community