तेव्हाच शिवसेना होणार एकनाथ शिंदेंची!

मागील तीन दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या विषयाने महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचा ४० आमदारांचा गट गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसला आहे, असे समजते. एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांश आमदार फोडल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय पटलावर शिवसेना नक्की कुणाची राहिली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत चर्चा केली.
प्रश्न – विधिमंडळ शिवसेना आणि बाहेरची शिवसेना असे दोन पक्ष राहू शकतात का? आणि हो तर खरा पक्ष नक्की कोणता?
उत्तर –  सध्या एकनाथ शिंदे यांचा गट त्यांच्याकडे दोन तृतीयांश आमदारांची संख्या असल्याचा दावा करत आहे. मात्र त्यांची कागदोपत्री संख्या नाही. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना आधी विधानसभेत स्वतःचा स्वतंत्र गट सिद्ध करावा लागेल. त्यानंतरच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देतील. त्यानंतरच शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची होईल आणि शिवसेनेचा उरलेल्या आमदारांचा गट हा नुसता गट म्हणून राहू शकतो.
प्रश्न – संख्याबळ वाढले म्हणून संपूर्ण शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाऊ शकते का?
उत्तर – एकनाथ शिंदे यांनी जर दोन तृतीयांश संख्याबळ सिद्ध केले, तरच शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात येईल. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल, पुढे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची परेड घेईल, शिंदे यांच्या गटात आलेले सगळे आमदार स्वखुशीने आले आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले तरच त्यांना शिवसेना म्हणून निवडणूक आयोग मान्यता देईल आणि एकनाथ शिंदे यांचा गट धनुष्यबाणाच्या चिन्हावर पुढील निवडणूक लढू शकतात. मात्र त्यासाठी खूप अवकाश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here