सध्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतील महत्वाचा आणि प्रमुख, मोठा पक्ष शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार कोसळले का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात मात्र सरकारमधील अन्य घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वार्थीपणा दाखवून दिला आहे. मागील तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने अध्यादेश निघत आहेत, त्यामध्ये मात्र सर्वाधिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्यांचे असल्याचे दिसून आले आहे.
शिवसेनेच्या संकटापासून दोन्ही काँग्रेस अलिप्त
सध्या शिवसेनेचे ४० हुन अधिक आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत, त्यामध्ये मंत्री आणि राज्यमंत्रीही आहेत, त्यामुळे साहजिकच शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा कारभार थांबलेला आहे. सरकारमधील प्रमुख पक्ष शिवसेना अस्थिर झालेला आहे. त्यामुळे एकूणच सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी शिवसेनेच्या सोबत असल्याचे दाखवत असतानाच शिवसेनेतील बंडाळी हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून दूर राहत आहेत. हेच दृश्य प्रत्यक्ष मंत्रालयात दिसत आहे.
(हेही वाचा तेव्हाच शिवसेना होणार एकनाथ शिंदेंची!)
दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांच्या दालनात गर्दी
मंत्रालयात शिवसेनेच्या मंत्र्यांची दालने रिकामी असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनात तुफान गर्दी आहे. सरकार शेवटची घटका मोजत आहे का, या शंकेने दोन्ही काँग्रेसमधील मंत्री वायू वेगाने फाईली मार्गी लावू लागले आहेत. लगोलग रखडलेले अध्यादेश प्रसिद्ध करू लागले आहेत. मागील दोन दिवसांत सरकारने तब्बल ११२ अध्यादेश काढले, याचा अर्थ तासाला दोन जीआर प्रसिद्ध झाले आहेत. या अध्यादेशांपैकी सर्वाधिक अध्यादेश हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्यातील आहेत.
मागील तीन दिवसांत कुणाचे किती अध्यादेश
- २३ जून (संध्याकाळी साडेतीन वाजेपर्यंत) – एकूण १७ अध्यादेश, त्यातील ३ शिवसेनेच्या खात्यातील, तर १४ अध्यादेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्याचे
- २२ जून – एकूण ४८ अध्यादेश, त्यातील १ शिवसेनेच्या खात्यातील, तर ४७ अध्यादेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्याचे
- २१ जून – एकूण ७३ अध्यादेश, त्यातील १५ शिवसेनेच्या खात्यातील, तर ५८ अध्यादेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्याचे
(हेही वाचा एकनाथ शिंदेंसोबत 35 आमदारांची बंडखोरी, महाविकास आघाडी सरकारचे 101 जीआर!)
Join Our WhatsApp Community