शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या विरोधात त्यांचेच पक्षांतर्गत विरोधक रस्त्यावर 

94

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शनिवारी, २५ जून रोजी पाचवा दिवस, या दिवशी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोर आमदारांच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना शिवसेना आणि बाळासाहेब यांच्या नावाचा वापर न करता स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागा असे म्हटले. त्यानंतर एकामागोमाग एक बंडखोर आमदारांचे घर, कार्यालयावर शिवसैनिकांकडून हल्ले होऊ लागले. अर्थात हे हल्ले शिवसैनिक करत आहेत जे त्या त्या बंडखोर आमदारांचे पक्षांतर्गत विरोधक आहेत. त्यामुळे यानिमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद, बंडखोर आमदारांचे पक्षांतर्गत विरोधक रस्त्यावर आले आहेत.

 कोल्हापुरात राडा, तानाजी सावंतांबाबत नाराजी 

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊ लागलेली. याची परिणती कोल्हापुरात दिसत असून इथे बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद उफाळून आला आहे. इंगवले यांनी कोल्हापुरात काढलेल्या मोर्चादरम्यान राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्यानंतर क्षीरसागर यांनी इंगवलेंना उघड धमकी दिली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सध्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी या आमदारांचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. पुण्यात तानाजी सावंत यांचे कार्यालय काही शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरात बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान फाडण्यात आले. यावरून आता क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात जुंपली आहे.

(हेही वाचा सध्याची राजकीय परिस्थिती खेळाडूवृत्तीने स्वीकारा! एकनाथ शिंदे गटाचे आवाहन)

काय म्हणाले क्षीरसागर? 

इंगवलेंनी या मोर्चादरम्यान क्षीरसागर यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या नावावर जोगवा मागून प्रचंड माया कमावल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर एका व्हिडीओच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी थेट उघड धमकीच दिली आहे. बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतोय की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. हे बाकीचे खेळ बंद कर. माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचे नुकसान होत असेल तर यांना पाठिशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढे लक्षात ठेव, असे क्षीरसागर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.