उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेत कमालीची नाराजी होती, हिंदुत्वाच्या विचारासाठी भाजपासोबत पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट बनवला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली, त्यांना शिवसेना नेते पदावरून हटवले. असे असले तरी मनाने उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली नाही, अशी शंका यावी, असे चित्र दिसत आहे. कारण शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर एकनाथ शिंदे अजूनही शिवसेना नेते म्हणून विराजमान आहेत.
एकनाथ शिंदेची हकालपट्टी तरी…
एकनाथ शिंदे हे जेव्हा २० जून रोजी शिवसेनेतील २९ आमदार सोबत घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले, तेव्हाच शिवसेनेत खळबळ माजली होती, त्यानंतर पुढील २ दिवसांत शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्यात आले, तसेच शिवसेना नेते पदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर ११ दिवसांनी थेट शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यामध्ये स्वतः शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. सरकारने बहुमत सिद्ध करताना शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार जमा झाले होते. अशा रीतीने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ५५ पैकी अवघे १५ आमदार उरले आहेत. असे असले तरी शिंदे गटाने अद्याप उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य केले नाही. स्वतः उद्धव ठाकरे हेदेखील अजूनही शिंदे गटातील आमदारांचा तिरस्कार करत नाही. म्हणूनच की काय शिवसेनेच्या संकेतस्थळावर शिवसेना नेत्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि नाव कायम ठेवण्यात आले आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! अनेक नद्यांनी ओलांडली पातळी, 27 गावांचा तुटला संपर्क)
उपनेते आणि प्रवक्तेही तेच
तर उपनेतेपदी आमदार गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, उदय सामंत ही शिंदे गटातील आमदारांची नावे कायम आहेत, तर प्रवक्ते पदी आमदार प्रताप सरनाईक यांचेही नाव कायम आहे.
मंत्रीमंडळही तेच!
संकेतस्थळावर मंत्रिमंडळही कायम आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार या शिंदे गटातील आमदारांची नावे जे आधी मंत्री म्हणून होते त्यांची नावेही कायम आहेत.
Join Our WhatsApp Community