शिवसेनेची फरपट

79

सध्याचं राजकारण पाहता हिंदुत्ववादी विचाराच्या शिवसेनेची झालेली अवस्था पाहून तमाम हिंदुत्ववादी लोकांना मनातून नक्कीच वेदना होत आहेत. पण, आजच्या अवस्थेला जबाबदार कोण, यावर मात्र त्यांच्यातही मतभेद आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ठाकरे घराणे त्याच थाटाने पुढे चालवेल अशी अपेक्षा होती. मात्र, राणे, राज ठाकरेंच्या बंडांनंतर शिवसेनेच्या नवनेतृत्त्वावर कायम शंका उठत राहिल्या. परंतु, जोपर्यंत कट्टर हिंदुत्त्ववाद जपला जात होता तोवर भाजपासारख्यांचा शिवसेना संपवण्याचा प्रयत्नही कायम अपयशी ठरला. आता मात्र, शिवसेनेनं बाळासाहेबांच्या कट्टरतेलाच तिलांजली देत घड्याळ हातात घातले आणि फासे उलटे पडत गेले.

हिंदुत्वाला दूर केले 

उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची निवडताना बाळासाहेबांचे नावही ठळकपणे मधे वापरण्यास सुरुवात केली. पण, त्या नावाचा मान राखण्यात ते काहीसे अपयशी पडू लागले. कारण, जनाब बाळासाहेब, अजान स्पर्धा, टिपू सुलतान उड्डाणपुलाचा वाद ही काही शिवसेनेची ओळख नव्हती. त्यानंतरही खरा हिंदुत्ववादी शिवसैनिक गप्प होता. काँग्रेसने त्यांच्या शिदोरी मासिकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या चिखलफेकीनंतरही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गप्प बसले, हेही शिवसेनेसाठी नवनिर्माणच ठरले. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याला वंदन करायलाही विसरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरेंंवर मित्रपक्षांचे दडपण असल्याचे प्रकर्षाने दिसले. परंतु, खरा शिवसैनिक तरीही दिवस बदलतील या अपेक्षेवर राहिला. परंतु, अडीच वर्षांनंतरही शिवसेनेचा मार्ग विनाशाकडेच वाटचाल करतोय की काय अशी भीती वाटू लागली. कारण, पवारांची राष्ट्रवादी सरस ठरताना दिसू लागली. आणि, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात हिंदुत्वाला दूर ठेवण्यातच शिवसेनेची फरपट होऊ लागली.

(हेही वाचा Hindusthan Post Impact : महाविकास आघाडी सरकारच्या ‘जीआर’चा मुद्दा पहिला ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच उजेडात आणला!)

शिवसेनेचं नवनिर्माण करा

एका बाजूला हिंदुत्ववादीही म्हणायचे आणि दुसरीकडे कृतीतून मात्र शून्य परफॉर्मन्स दिसत होता. मशिदीवरच्या भोंग्यांनी तर शिवसेनेचा पार भोंगाच वाजवला. भाजपासारखा शत्रू समोर आहे हे माहीत असतानाही उद्धव ठाकरे डावपेचात कमी पडले. औरंगाबादचे संभाजी नगर करण्याच्या वादात तर शिवसेनेची तडफड सर्वांनाच दिसून आली. नेतृत्त्वाचे अपयश आणि अपयशी नेतृत्त्व या दोन्ही गोष्टी प्रकर्षानं समोर येत राहिल्या. आता तर एकनाथ शिंदेंच्या बंडाने या नेतृत्त्वाची पार पिसे काढली आहेत. खरंतर अजूनही वेळ गेली नाही. पुन्हा जुन्या शिवसेनेच्या ध्येयधोरणांना आपलंसं करा आणि या नतद्रष्टांची साथ सोडून द्या, हीच खऱ्या शिवसैनिकांची मनोमन मागणी आहे. भाजपाशी संग नको असेल तर विरोधात बसा, पण घड्याळ हातात बांधून पक्षाच्या गळ्याला फास लावू नका, हेच या कट्टर, निष्ठावान शिवसैनिकांचं मागणं आहे. अर्थात, शिवसेनेसारख्या एकखांबी तंबूत उघडपणे बोलण्याची सोय नसल्यानेच एकनाथ शिंदेंना वाढता पाठिंबा मिळतोय. बडव्यांच्या संगतीतला विठ्ठल खऱ्या भक्तांपासून तुटतो, असं म्हणतात. पण खरा विठ्ठल गोरा कुंभार ओळखून मंदिरच फिरवतो, हेही लक्षात घ्या. घड्याळ आणि हाताच्या कपटातून सुटका करून कमळाच्या चिखलातही न फसता पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्या, हीच तमाम बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांची इच्छा आहे. उगाच आकड्यांच्या आणि सत्तेच्या खेळात फसून स्वतःला संपवण्यापेक्षा आजवरच्या चुका मान्य करा आणि पुन्हा मतदारांना सामोरं जाण्याचं धाडस दाखवा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, या उक्तीनुसार शिवसेनेचं नवनिर्माण करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.