गेले तीन-चार दिवस आपण पाहत आहात की कशा प्रकारे या घडामोडी घडत आहेत. आज मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या बरोबर उभे राहण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिला आहात. ठाण्यासोबत बाहेरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले त्यासाठी त्यांना लोकांनी समर्थन दिले. आजही एकनाथ शिंदे हे आपण शिवसैनिक असल्याचेच म्हणत आहेत. महाराष्ट्रात आज मोठी घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदेंसोबत आज शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार आहेत. मला वाटतं इतिहासातील ही पहिली घटना असेल की इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. यासाठी काहीतरी कारण आहे. मनामध्ये जी धुसफूस होती त्याचा विस्फोट झाला आहे. लोक इतक्या संख्येने इथे उपस्थित का आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात शनिवारी, 25 जून रोजी सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर शिंदे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाषण करत बंडखोर आमदारांचे समर्थन केले आहे. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही भाषण केले.
(हेही वाचा सध्याची राजकीय परिस्थिती खेळाडूवृत्तीने स्वीकारा! एकनाथ शिंदे गटाचे आवाहन)
गेल्या अडीच वर्षांत मोठा असंतोष
अडीच वर्षे जी अनैसर्गिक आघाडी झाली त्यातून आपण बाहेर पडले पाहिजे असे का वाटले? यामध्ये कोणाचा तरी दोष असेल. याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. आमचे मुख्यमंत्री आहेत म्हणून कार्यकर्त्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिवसंपर्क अभियानासाठी पाठवले होते. कार्यकर्त्यांची कामे होत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठवले होते. साताऱ्यात गेल्यावर आम्हाला निधी मिळत नाही हे तिथल्या आमदारांचे रडगाणे होते. आम्हाला निधी मिळाला तरी तो थांबवण्याचे काम राष्ट्रवादीचे मंत्री करतात. अशावेळी आम्ही काम कसे करायचे ते म्हणाले. सत्तेमध्ये असून आमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचा फायदा काय? हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. कार्यकर्त्यांचा जीव आघाडीमध्ये घुसमटत आहे असेही आम्ही सांगितले. साताऱ्यामध्ये साखर कारखान्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शिवसैनिकाला तिथे ऊस न्यायचा असेल तर कुठल्या पक्षाचा आहेस असे विचारले जाते आणि त्यांनतर ऊस घेतला जातो. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा ऊस असेल तर लागेल तर घेतला जातो नाहीतर त्याला तो जाळावा लागतो. गेल्या अडीच वर्षामध्ये इतिहासात कधी शिवसेनेसोबत इतका असंतोष झाला नव्हता तो सत्तेत आल्यापासून झाला आहे. याचा विचार व्हायला पाहिजे होता, असेही खासदार शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community