महाविकास आघाडी स्थापन होत होती, तेव्हा पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांचा जीव गुदमरत होता. आपल्यासमोर पक्षाची वाताहात होताना त्यांना दिसत होती. उद्धवजी ऐकण्याच्या मानसिकतेत तेव्हा नव्हते. एवढेच काय एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि तेव्हा जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला उद्धव ठाकरे यांनी संपर्क केला होता असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
बराच काळ दोन्ही बाजूला त्यांची बॅटिंग सुरू होती. ती खरी आमच्या बाजूला होती की महाविकास आघाडीच्या बाजूला होती ते मला माहित नाही. मात्र हळूहळू आमच्या लक्षात आले की, यांना फक्त आम्हाला गुंगवत ठेवायचे आणि पाच वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत काढायची आहेत. आम्ही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत गेलो.
एकनाथ शिंदे सुरतमार्गे आमदारांना घेऊन निघाले, तेव्हा उद्धव ठाकरेंना संपर्क केला होता का? या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे आहे की संपर्क तर झालाच होता. त्यानंतरही झाला होता. पण त्यावेळी मी उत्तर दिले की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहे. त्या क्षणी मला असेही सांगण्यात आले की जाऊदेत आता झाले ते झाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी खूप स्पष्टपणे सांगितले की आता ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही. जे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना आम्ही तोंडघशी पाडू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार बाहेर पडल्यावर आणि आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना तोंडघशी पाडण्याचा काही प्रश्नच येत नाही हे उत्तर मी दिले आणि तुमचे इतर काही असेल तर दिल्लीत बोला असेही मी त्यांना सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा माझ्यावर टीकेची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीमने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन माझा अपमान केला. मला आणि माझ्या कुटुंबाला राजकीय जीवनातून उठवायचे यासंदर्भातल्या काही घडामोडी आणि षडयंत्रे झाली त्यामुळे माझ्या मनात राग तर प्रचंड होता. त्यामुळे मी बदला घेतला असे म्हटले होते. पण मला अनेकांनी सुचवले की हा शब्द वापरू नये. मलाही ते पटले की हा शब्द वापरणे योग्य नाही, त्यामुळे मी तो शब्द वापरला नाही.