महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर गुरुवार, ०५ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे मोठ्या उत्साहात महायुतीचा सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या वेळी देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या तिघांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा दिमाखदार सोहळा झाला. मात्र या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या शपथेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
(हेही वाचा Devendra Fadnavis : मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….)
शपथ घेण्यापूर्वी शिंदेंनी कुणाची नावे घेतली?
फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील १३ कोटी जनतेच्या आशीर्वादाने शपथ घेतो की, असे म्हटले. त्यामुळे शिंदे यांची शपथ सर्वांचे लक्ष वेधून घेतली.
एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतील 40 आमदार फोडून भाजपाच्या पाठिंब्याने अडीच वर्षांपूर्वी युतीचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार विसरून कॉँग्रेससोबत गेल्याचे कारण दिले आणि आम्ही मूळ शिवसेनेतून बाहेर पडून भाजपाशी युती करून खऱ्या अर्थाने बाळसाहेबांची शिवसेना सुरक्षित ठेवली, असा दावा केला आणि करत आहेत, तसेच आपण स्वर्गीय आनंद दिघे यांचे शिष्य असल्याचे वारंवार सांगितले आहे. याशिवाय मागील अडीच वर्षात राज्याचा मुख्यमंत्री पदाचा सांभाळ करताना एकनाथ शिंदे यांचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले सूर जुळले आहेत. शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वी या सर्वांची नावे घेण्याला ही सगळी पार्श्वभूमी होती.