आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. अडीच वर्षांपूर्वी इथेच देवेंद्र फडवणीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आज मी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करत आहे. या आधीच शिवसेनेच्या वतीने आम्ही देवेंद्र यांना पाठिंबा दिला होता. मी याआधीच ही भूमिका घेतली होती. मी सरकारमध्ये रहावे यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
राज्यपालांना भेटून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. मी गावी गेलो तेव्हा माध्यमांनी काय काय बातम्या चालवल्या, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात इतके बहुमत कुणाला मिळाले नव्हते, यासाठी लाडकी बहीण, लाडके भाऊ आणि शेतकरी यांचा समावेश यशामध्ये आहे, असेही शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)
फडणवीसांना ५ वर्षांचा आणि मला अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा….
आमच्यात कुणी मोठा आणि कुणी छोटा असे काही नव्हते. सर्वसामान्यांचे सरकार म्हणून आम्ही अडीच वर्षे काम केले. राज्य चालवताना जे निर्णय आम्ही घेतले, ते कल्याणकारी होते. जे प्रकल्प मविआने थांबवले होते आमचे सरकार आल्यावर ते तात्काळ आम्ही सुरु केले होते. सरकार सर्वसामान्यांसाठी असते त्याचे आम्ही तंतोतंत पालन केले. आमच्या सरकारच्या कामासाठी केंद्राचाही पाठिंबा राहिला. आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने भरभरून दिली. सर्वांचे अंदाज बाद ठरवले. लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी यांच्यामुळे ऐतिहासिक यश मिळाले. देवेंद्र फडणवीस यांना ५ वर्षांचा मुख्यमंत्री म्हणून अनुभव आहे आणि मलाही अडीच वर्षांचा अनुभव आहे. मला खूप आनंद आहे, आमच्या सरकारने जी कामे केली तो इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. माझी तब्येत चांगली आहे, असेही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
Join Our WhatsApp Community