आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याची मोहीम हाती घेतली असून, खासदार गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
( हेही वाचा : गुजरातची बोट रत्नागिरीच्या समुद्रात बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू)
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, मुख्यनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका क्षेत्राची संघटनात्माक कार्याची जबाबदारी सहा पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात खासदार तथा शिवसेना नेते गजानन किर्तीकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार व उपनेते राहुल शेवाळे, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामिडी, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.
उद्धवसेनेला मोठे खिंडार पडणार?
- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करून मतदारांना सामोरे जाण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखली असताना, एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत (कवाडे गट) युती करून उद्धवसेनेला शह दिला आहे.
- दुसरीकडे कीर्तिकर यांच्यासारख्या जाणत्या शिवसैनिकाकडे मुंबईची संघटनात्मक धुरा देऊन एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीची दिशा आखून दिली आहे.
- त्याचप्रमाणे १३ खासदारांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या राहुल शेवाळे यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- एकंदरीत, गेल्या काही दिवसांत शिंदे गटात घडत असलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास लवकरच मोठ्या संख्येने नगरसेवक फुटून उद्धवसेनेला मोठे खिंडार पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.