शिंदेंचा शिवसेनेला जबरदस्त दणका, प्रभुंना हटवले गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती

99

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत तब्बल 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यासोबत असलेले आमदार हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असून, हीच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर आता त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिवसेना ही आमचीच असल्याचे आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः शिवसेना सोडणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले)

शिंदेंनी केली प्रतोदाची नियुक्ती

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांना शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु यांनी बुधवारी एक पत्र पाठवून पक्षाच्या सभेला उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी थेट भरत गोगावले यांची शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत याबबातची माहिती दिली आहे. त्यांच्या या मोठ्या निर्णयामुळे आता एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः मुंबईत या, नाहीतर कारवाई करू! बंडखोरांना शिवसेनेचे अल्टिमेटम)

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच गोगावले यांची नियुक्ती झाल्याचे पत्रही त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.