गजानन कीर्तिकर यांनी किती खोके घेतले? ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचले, शेकडो केसेस अंगावर घेतल्या, त्यांच्यावर खोके घेतले म्हणून आरोप करता. रामदास कदम यांना संपवायला निघाले, योगेश कदम या उमद्या तरुणांना संपवायला निघाले, राष्ट्रवादीसोबत जाऊन खेडमधील २ नगरपरिषदा दिल्या. षण्मुखानंद येथे त्या सभेला येऊ नका, असे मी स्वतः रामदास कदम यांना सांगितले होते, कारण जसे मनोहर जोशी यांना शिवाजी पार्क येथे व्यासपीठावरून खाली उतरवायला लावले होते, तोच कट रामदास कदम यांच्याविरोधात रचण्यात आला होता. असे कोणता नेता आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारस्थान रचतो. बाळासाहेब असते तर मनोहर जोशी यांच्याविषयी असे वागले असते का? धर्मवीर आनंद दिघे जेलमध्ये होते तेव्हा बाळासाहेब त्यांना भेटायला गेले होते. बाळासाहेब कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणारे होते. नारायण राणेंचा काय गुन्हा होता? रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून त्यांचा आवाज बंद करता, असा पक्ष कसा मोठा होणार? कार्यकर्ता मोठा तर पक्ष मोठा होतो, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे गोळीबार मैदान येथे आयोजित सभेत केला.
(हेही वाचा वरळी सीफेस परिसरात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू)
वीर सावरकरांचा अवमान केला तरी गप्प राहिले
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात पण त्यावर काही चकार बोलत नाही. मणिशंकर अय्यर यांनी सावरकर यांचा अपमान केला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना चपलेने मारले होते. म्हणून आम्ही बंडाचा निर्णय घेतला. तुम्ही कुणासोबत आहात हे ठरवा. बाळासाहेबांनी कधी त्यांना जवळ केले नाही अशा लोकांना त्यांनी जवळ केले, आम्ही ते करणार नाही. जो राज्य जिंकू शकत नाही, जो स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबादारी घेऊ शकत नाही त्या राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार का? हिंदुत्वाचे जेव्हा जेव्हा विषय येऊ लागले तेव्हा तेव्हा तुम्ही भूमिका बदलायला लागले, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्यासाठी तुमची जीभ कचरू लागले, त्यांनी तुमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा दिवा पेटवला आणि तुमची मती फिरली. जे तुमच्या गळ्यात गळा घालत आहेत ते उद्या तुमचा गळा कापतील हा एकनाथ शिंदे गद्दार नाही खुद्दार नाही, माझ्या रक्तात बेइमानी नाही. तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंदा होणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.