गुवाहाटी येथे गेलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचा गट आता अधिक सक्रिय झाला आहे. यावेळी या सर्व आमदारांनी जय महाराष्ट्र म्हणत घोषणाबाजी केली. आज बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे विशेष विमानाने मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार आहेत. दरम्यान, शिंदेने काही मोठी विधानं देखील केली, यामुळे ठाकरे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
(हेही वाचा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ३५ नव्हे ४० सेना आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा!)
1. ४० आमदार सोबत असल्याचा शिंदेंचा दावा
दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ शिंदेंसोबत असणं गरजेचं आहे. ३७ हा आकडा शिंदेंना गाठायचा असून आता त्यांनी स्वतःसोबत ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिंदे भाजपसह सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तविली जात असून ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
2. माझ्यासोबत आहे ती खरी शिवसेना
शिवसेनेसोबतच्या सर्व वाटाघाटी फोल ठरली असून माझ्यासोबत आहे ती खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवरून संभाषण झालं मात्र यामधून देखील कोणताही तोडगा निघालेला नसल्याने शिवसेनेच्या हाताबाहेर आता सर्व परिस्थिती जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिंदेंकडे किती आमदार आहेत यावर शंका उपस्थित केली जात आहे. संजय राऊत यांनी देखील बोलताना अप्रत्यक्षपणे संख्याबळ मोजण्याची तयारी दर्शविली, त्यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडल्याचेही एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
3. वारंवार बाळासाहेबांचाच उल्लेख
सध्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाचे नाव न घेता वारंवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख शिंदेंनी केला. शिवसेना सोडणार नाही, असेही ते पुन्हा पुन्हा सांगत आहे. म्हणजेच ते शिवसेनेतून बाहेर पडणार नाहीत. पहिल्यांदा ट्विटद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत देखील त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा आवर्जून उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंच्या ट्विटचा अर्थ काय?)