जवळगावमधील रविवारी पाचोरा येथील सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेचा निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून करण्यात आला आहे. ‘ज्यांच्यापाया खालची वाळू सरकली आहे, ज्यांना द्वेषाने पछाडले आहे, त्यांच्याकडून जे वक्तव्य झाले आहे, त्याचा मी निषेध करतो,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, अतिशय दुर्दैवी हे वक्तव्य आहे. या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले नेतृत्व फक्त देशात नाहीतर जगात सिद्ध केले आहे. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. ज्यामुळे जी-२०चे अध्यक्षपद आपल्याला मिळाले आहे. खरे म्हणजे मोदींसाहेबांच्या परिवाराबद्दल किंबहुना एकेरी उल्लेख करणे, याची जेवढी निंदा किंवा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मोदी साहेबांच्याबद्दल प्रत्येक देशवासियाला गर्व आणि अभिमान वाटावा, असे त्यांचे काम आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, संपूर्ण देशातील जी दीडशे कोटी जनता आहे, हा सगळा त्यांचा परिवार आहे. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे देशातील जनतेला आपले मानतात. म्हणून आपण पाहिले, जेव्हा त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले, त्यावेळेस अंतविधी झाल्यानंतर त्यांनी प्राधान्य कर्तुत्वाला दिले, जबाबदारीला दिले. या देशाचे जे प्रकल्प होते, त्याला प्राधान्य दिले. यावरून त्यांनी त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती सिद्ध केलेली आहे.
वैयक्तिक द्वेशातून झालेले वक्तव्य
पुढे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, ‘जे कालचे वक्तव्य झाले, ते वैयक्तिक द्वेशातून झालेले दिसून येत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेशाने पछाडली जाते आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे, यशस्विता जी आहे, याची पोटदुखी जेव्हा निर्माण होते, तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे पाप काही लोक करतात. ज्यांनी २५ वर्ष या ठिकाणी युती म्हणून कामकाज केले, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारे वक्तव्य करणे हे निंदाजनक आहे. बाळासाहेबांची संस्कृती नाही. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, सत्तेसाठी, खुर्चीसाठी. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो. हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता या देशात नाही, तर जगात आहे. याचा गर्व आणि अभिमान या देशवासियांना असला पाहिजे. परंतु ज्यांच्यापाया खालची वाळू सरकली आहे, ज्यांना द्वेषाने पछाडले आहे, त्यांच्याकडून जे वक्तव्य झाले आहे, त्याचा मी निषेध करतो.’
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
‘ते (नरेंद्र मोदी) म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं?,’ असे एकेरी भाषेत उद्धव ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – …तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही: राऊतांच्या ४०० कोटींच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे आव्हान)
Join Our WhatsApp Community