मुंबईला जगातील ‘बेस्ट’ शहर बनवणार – एकनाथ शिंदे

142
मुंबईने आजवर कोणतीही तक्रार न करता आपल्या सगळ्यांचे पालनपोषण केले आहे. त्यामुळे आपण तिच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. सरकार बदलल्यामुळे आता मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. मुंबईला जगातील ‘बेस्ट’ शहर बनविण्याचा आमचा मानस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले.
‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन @ २०३४’ या परिषदेत ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने शनिवारी वरळी येथे या विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले.
शिंदे म्हणाले, इतरांसारखे मुंबईला शांघाय-वांघाय बनवण्याच्या घोषणा आम्ही करणार नाही. आम्हाला मुंबईला स्वच्छ आणि चांगले शहर बनवायचे आहे. मुंबईच्या विकासात सर्व पक्षीयांचे योगदान महत्त्वाचे. त्यात माध्यमांचा वाटाही मोठा आहे. ते चुकीच्या मुद्द्यांवर बोट ठेवतात आणि प्रशासनाला जाग आणून देतात. मुंबई आणि महानगरात झोपडपट्टी पुनर्वसन, पाणी तुंबणे यांसारख्या  अनेक समस्या सध्या आवासून उभ्या आहेत. त्यावर महानगरपालिका आणि एमएमआरडीए काम करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

… तर ४० लाख खासगी वाहने कमी होतील

सातत्याने वाढणारी लोकसंख्या हे मुंबईपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे स्थलांतरित होत आहेत. पण तिच्याही काही मर्यादा आहेत. वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरू असून, एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठे आणि महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २०२६ पर्यंत ३३७ किमी मेट्रोचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास रस्त्यावरील ४० लाख खासगी वाहने कमी होतील आणि प्रदूषणातून मुक्ती मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतरांसारखी खोटी आश्वासने देत नाही

  • यावर्षी मुंबईत ४५० कोटींचे रस्ते बनवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. चांगल्या दर्जाचे काम करणाऱ्या कंपन्यांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. ५ हजार ५०० कोटींच्या निविदा काढल्या असून, मार्च २०२३ पर्यंत आणखी ४५० किमी रस्त्यांसाठी निविदा काढणार आहोत.
  • झिरो सिग्नल ही संकल्पना येत्या काळात राबवणार आहोत. हे सरकार काम करणारे आहे. इतरांसारखी खोटी आश्वासने आम्ही देत नाहीत. तीन महिन्यांपूर्वी एक टार्गेट पूर्ण केले. अशीच टार्गेट यापुढेही पूर्ण केली जातील.
  • मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘आवास’ योजना व्यापक स्तरावर राबवणार आहोत. त्यासाठी रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती दिली जाईल. त्याकरिता नियमांत बदल करण्याची आवश्यकता असल्यास, तेही करू, असेही शिंदे यांनी सांगितले.

( हेही वाचा: मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्राधिकरणांनी एकत्रित काम करण्याची गरज – राहुल शेवाळे )

कोळीवाड्यांच्या पर्यटन दृष्टीने विकास

  •  मुंबईतील १४३ कोळीवाड्यांच्या प्रश्नांसंदर्भात तोडगा काढून पर्यटन दृष्टीकोनातून त्यांचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. या माध्यमातून मूळ मुंबईकरांचे जीवनमान उंचावले जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी नवनव्या संकल्पना राबवणार आहोत. त्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरू आहे. धारावी हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत १२ हजार ९०० कोटींची मदत केंद्राकडून प्राप्त झाली आहे. सरकार बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते, या सरकारला सर्वतोपरी सहकार्य मिळेल. त्यानुसार त्यांचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यासाठी त्यांचे आभार
  • ज्या राज्यात वाहतूक व्यवस्था चांगली, त्याचा विकास गतिमान पद्धतीने होतो. त्यामुळे दळणवळणाच्या सर्व साधनांचा  विकास करण्यावर आम्ही भर दिला आहे. समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण. लवकरच त्याचे उद्घाटन होईल.
  • एमएसआरडीसी मुंबई-सिंधुदुर्ग किनारपट्टी मार्ग बनवणार आहे. हा एक्सिस कंट्रोल रोड असेल.असे ५ हजार किमी एक्सिस कंट्रोल रस्ते बनवणार आहोत. पायाभूत सुविधा उभारताना लोकांना त्रास होऊ देऊ नका, अशा सूचना सर्वच यंत्रणांना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.