सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
( हेही वाचा : दादर-माहीम, वडाळा आणि धारावीच्या विभागप्रमुख पदासाठी वरळीतील नेता होणार आयात? )
द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण समारंभानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मला निवेदन दिले आहे. यासंदर्भात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये, या संदर्भात कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ १०० ते १५० उमेदवारांच्या निवास व्यवस्थेसह येत्या काळात या सदनातील भूखंडावर ५०० ते ६०० उमेदवारांची व्यवस्था करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community