विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर रातोरात शिवसेनेतील ३५ आमदारांना घेऊन बंडखोरी करणाऱ्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाविकास आघाडी कोसळणार आहे, असे चित्र आहे. सध्या शिंदे हे आमदारांचा ग्रुप घेऊन गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांना गुजरात येथे पाठवले, त्यांच्या सोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी काही प्रस्ताव मांडले.
महाविकास आघाडी तोडा
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्या समोर काही प्रस्ताव मांडले, त्यामध्ये शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मुख्य मागणी आहे. दुसरा प्रस्ताव असा होता की, शिवसेनेने महाविकास आघाडी तोडावी आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे आणि तिसऱ्या प्रस्तावामध्ये जर शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत राहणार असेल तर आपण भाजपसोबत जाणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे हे प्रस्ताव स्पष्ट आहेत. शिंदे हे सध्याच्या महाविकास आघाडीवर नाराज आहेत. हिंदुत्वाची विचारधारा असलेल्या शिवसेनेला यामुळे कायम हिंदुत्व सिद्ध करावे लागत आहे. तसेच सत्तेचा शिवसेनेला तितकासा फायदा होत नाही, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत आहे, म्हणून एकनाथ शिंदे कायम नाराज होते.