येत्या मे महिन्यात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. अशातच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार प्रतिक्षेत असतांनाच केंद्रीय मंत्रीमंडळात मात्र मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२४ च्या निवडणुका लक्षात घेऊन फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील ऑगस्ट २०२२ पासून मंत्रीमंडळ फेरफार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
सूत्रांच्या माहितीनुसार २० केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होणार असून यामध्ये अनुराग ठाकूर, मनसुख मंडविया आदींचा समावेश आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा अनेक खाती आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश काही मंत्र्यांना दिले गेले आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन नेत्यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यांच्याबरोबर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार राहुल शेवाळे यांचीही नावे चर्चेत आहेत. आता गजानन किर्तीकरही पक्षात सामील झाले आहेत. त्यांच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, त्यामुळे कीर्तिकर यांना पुन्हा मंत्रिपदी संधी दिले जाते की इतरांना संधी दिली जाते, हे पाहावे लागणार आहे. तर बिहारमधून चिराग पासवान, आरसीपी यांना मंत्रिपदं मिळणार असल्याचे समजते आहे.
(हेही वाचा –मुंबईत ८३ जागा कायम राखण्याचेच भाजपपुढे आव्हान)
वयानुसार मंत्रीपद
ज्यांचे वय ६५ ते ७० च्या आसपास आहे त्यांना वगळलं जाणार असल्याचं म्हणटलं जात आहे. तसेच कामगिरीच्या निकषावर देखील ही मंत्रिपदं देखील काढून घेतले जाऊ शकते. पाच राज्यात म्हणजेच पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, मध्ये प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमुळे त्या राज्यातील नेत्यांना मोदी मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.