मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीने सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेचे खासदार फोडत राज्यात पुन्हा भुकंप घडविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चाही या निमित्ताने रंगू लागल्या आहेत. परंतु, केंद्रीय नेतृत्त्वाची सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो असून, अन्य कोणत्याही मुद्दयांवर चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीनंतर बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले. शिवाय १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्याने अधिवेशन पुढे-मागे होऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
शिंदे म्हणाले, हे सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आणि गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. देवेंद्र फडणवीस यांचेही सरकार स्थापनेत मोठे योगदान आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रपती, गृहमंत्री, सिंह, नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. दुपारी पंतप्रधानांना भेटून त्यांचे व्हीजन समजून घेणार आहोत. शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांना पाठबळ देण्यासह राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने हे सरकार स्थापन झाले आहे. या उद्देशपूर्तीसाठी केंद्राचे आशीर्वाद आवश्यक आहेत. ज्या राज्य सरकारला केंद्राचा पाठिंबा मिळतो, ते मोठ्या वेगाने प्रगतीकडे वाटचाल करते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात अलिकडे घडलेल्या घटनांची जगाने नोंद घेतलेली आहे. त्यामुळे चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली. देवेंद्र फडणवीस हा या सरकारचा भक्कम आधार आहे. त्यांनी पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्याकाळात लोकहीताचे अनेक निर्णय घेतले. अनेक विकास प्रकल्प राबविले. त्यातील खंडीत झालेले प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, आषाढी एकादशी झाली की मुंबईत बैठक घेऊन अंमित निर्णय घेतला जाईल. १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्यामुळे अधिवेशन मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. परंतु, अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करू
आम्हाला ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे. आरक्षणावर निर्णय झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची भूमिका आम्ही याआधी मांडली होती. सरकार म्हणून ती कायम आहे. त्यामुळे या प्रश्नावर निवडणूक आयोगाशी चर्चा करून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. ओबीसी प्रश्नावर तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी त्यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
…त्यांनी चांगल्या सूचना कराव्यात
आमदारांची अपात्रता आणि पक्षाच्या चिन्हाविषयी विचारले असता, हे प्रकरण सर्वेाच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अधिक भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आम्ही नियमानुसार सरकार स्थापन केलेले आहे. पक्षाविरोधात भूमिका घेताना ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील दहा वेळा विचार करतो. परंतु, माझ्यासोबत ५० हून अधिक आमदारांनी तशी भूमिका घेतली, यातच सगळे आले. हे बंड नव्हे, एक क्रांती आहे. अन्यायाविरोधातील उठाव आहे. सगळे आमदार स्वेच्छेने आलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर होणारे आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. आमचे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल. पुढची निवडणुकही आम्ही जिंकू आणि २०० आमदार निवडून आणू. त्यामुळे त्यांनी आता ‘त्या’ लोकांनी चांगल्या सूचना कराव्यात, विधायक कामांकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही शिंदे यांनी नाव न घेता लगावला.
दिशाभूल सुरू
महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण मुंबईकर जनता सुज्ञ आहे. अडीज वर्षांपूवी जे सरकार स्थापन व्हायला हवे होते, ते आम्ही आता स्थापन केले. शिवसेनेचे खासदार फोडण्यासंदर्भात कुठलीही बैठक झाल्याचे माहित नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदेंना पूर्ण सहकार्य – फडणवीस
भारतीय जनता पक्षानेच मला मोठे केले. त्यामुळे मी नाराज असल्याच्या तद्दन चर्चा तथ्यहीन आहेत. मी नेत्यांच्या आदेशाचे पालन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्येक गोष्टीत सहकार्य करून त्यांच्या नेतृत्त्वात लोकहीताचे निर्णय घेणे, ही आमची प्राथमिकता असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community