राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी थेट गुरातमधील सुरत गाठले. त्यानंतर तिथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर ते थेट आसाममधील गुवाहाटीला काही आमदार घेऊन दाखल झाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुवाहाटीतून आपला मुक्काम गोव्यात हलवला. आता या मागचे कारण शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी उत्तरात त्यांनी हा खुलासा केला आहे.
…म्हणून आम्ही दुस-या राज्यात गेलो
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे आम्ही दुस-या राज्यांत गेलो, असे शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे. संजय राऊतांमुळे आमदारांच्या जिवांना धोका होता, असे शिंदे गटाने म्हटले आहे. आमदार महाराष्ट्रात परतले तर त्यांना फिरणे कठीण होईल, या राऊतांच्या विधानाचा दाखला शिंदे गटाने आयोगाला दिला आहे.
( हेही वाचा: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण )
शिंदे- ठाकरे गटाचा पक्षावर आणि चिन्हावर दावा
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे तसेच शिंदे गटानेही आपापले लेखी म्हणणे सादर केले आहे. एकनाथ शिंदेंकडे घटनात्मक पद आणि पक्षाची घटनाही नाही, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे बंड केले. त्याची तारीख, वारासकट उत्तरे देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आमदार-खासदारांच्या संख्याबळानुसार मान्यता मिळते. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळावे, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला आहे.