राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हावर नेमका कुणाचा अधिकार आहे? या मुद्यावर निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बंडाचे निशाण फडकवित राकॉवर आपला हक्क सांगितला आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पक्षात कोणत्याही प्रकारची फूट झाली नसून आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असा दावा केला आहे.
निवडणूक आयोगापुढे आज झालेल्या सुनावणीच्या वेळी शरद पवार उपस्थित होते. मात्र, अजितदादा पवार यांच्या गटाकडून कुणीही या सुनावणीच्या वेळी उपस्थित नव्हते. महत्वाचे म्हणजे, या सुनावणीला हजर राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल दिल्लीत आले होते. परंत, ते सुनावणीला का आले नाही? हे कळू शकले नाही.
(हेही वाचा-Waghnakh Poster in london : लंडनच्या रस्त्यावर झळकतंय महाराष्ट्र सरकारचं पोस्टर)
दरम्यान, ज्येष्ठ वकिल मनू अभिषेक सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली तर अजितदादा गटाकडून मनिंदर सिंग यांनी युक्तीवाद केला. आमच्याकडे सर्वाधिक आमदार, खासदार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळे आमचाच गट खरा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष असल्याचा युक्तीवाद मनिंदरसिंग यांच्याकडून करण्यात आला. तर, शरद पवार गटाची बाजू मांडताना सिंघवी यांनी घड्याळे पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठविण्यात येवू नये, अशी मागणी केली. या प्रकारणाची पुढील सुनावणी 9 आक्टोबर रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकारावरून सुनावणी सुरू असतानाच शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी गेले. काँग्रेस नेते राहुल गांधी सुध्दा या ठिकाणी आले होते. उभय नेत्यांनी आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीची रणनिती कशी असावी? यावर विचार विनिमय केला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community