मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी निवडणूक विभाग मात्र आगामी निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. निवडणूक कार्यक्रम केव्हाही जाहीर झाला तरी आपली त्रेधातिरपीट उडणार नाही याची काळजी महापालिका निवडणूक विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास आचारसंहितेच्या काळातील व्हिडीओ चित्रण करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी महापालिकेने व्हिडीओ कॅमेरा, सी.सी.टिव्ही कॅमेरा, प्रोजेक्ट स्क्रीन, लॅपटॉप,रंगीत टिव्ही संच आणि डी.व्ही.डी संच प्लेअर आदींचा पुरवठा करण्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे तिसरे डोळे सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुला आता १० मीटरचा सर्व्हिस राेड; आर.के.मधानी कंपनीचा पुन्हा महापालिकेत प्रवेश)
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ आचारसंहिता कालावधीत तसेच निवडणूक आयोग आखून देईल त्याप्रमाणे त्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी हे विविध घटनांचे छायाचित्रण करून ते डीव्हीडीच्या स्वरुपात लक्ष ठेवून असतात. तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना कामाचे प्रशिक्षण देऊन हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी बंदिस्त तसेच मोकळ्या जागांमध्ये व्यावसायिकपणे काम करु शकतील अशाप्रकारे काही व्यावसायिक संस्थांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये व्हिडीओ कॅमेरा, सी.सी.टिव्ही कॅमेरा, प्रोजेक्ट स्क्रीन, लॅपटॉप,रंगीत टिव्ही संच आणि डी.व्ही.डी संच प्लेअर आदींचा पुरवठा करण्यासाठी काही बेरोजगार संस्थांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवली होती.
या निविदेमध्ये या सर्व उपकरणांचा पुरवठा सुमारे २५ ते ४० दिवस करण्यासाठी या निविदा मागवल्या होत्या. यामध्ये शहरातील ९ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये तथा मतदान यंत्र ठेवण्याचा स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी वेबबेस सीसीटिव्ही यंत्रणा उभारणे,निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना ४ ठिकाणी सुमारे १२ ते १५ दिवस कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रोजेक्टर, स्क्रिन आणि लॅपटॉपची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.
यासाठी श्री स्वामी समर्थ बेरोजगार सहकारी संस्था ही पात्र ठरली असून यावर ३ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभगाच्या माध्यमातून राबवलेल्या निविदेमध्ये अंतिम पात्र कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून कोणत्याही क्षणी निवडणूक तारीख जाहीर झाल्यास महापालिकेकडे त्यासाठी आवश्यक उपकरणांच्या पुरवठ्यासाठी संस्थेची नेमणूक झालेली असल्याने कोणत्याही प्रकारची अडचणी निवडणूक कामांमध्ये येणार नाही,असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अशाप्रकारे घेतले जाणार भाडेतत्वावर उपकरणे
- व्हिडीओ कॅमेरा २४ तास चालकांसह: १२,३४०
- सी.सी.टिव्ही कॅमेरा, : ७९७
- प्रोजेक्ट स्क्रीन : ६०
- लॅपटॉप : ६०
- रंगीत टिव्ही संच :७७०
- डी.व्ही.डी संच प्लेअर :९४०