काही दिवसांतच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक नेते विजयी हॅटट्रिक करण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. एक उमेदवार असाही आहे, जो सातत्याने निवडणुका लढवून हरण्याचीच हॅटट्रिक करत आहे. तो उमेदवार आहे तमिळनाडूचे (Tamil Nadu) के. पद्मराजन (K Padmarajan) ! पद्मराजन यांनी त्यांच्या आयुष्यात स्थानिक निवडणुकीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत 238 वेळा निवडणूक लढवली; पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यासाठी त्यांना ‘इलेक्शन किंग’ आणि ‘वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूजर’ ही पदवी मिळाली आहे. (Election King Padmarajan)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची – डॉ. किरण कुलकर्णी)
मी जिंकलो, तर मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो – पद्मराजन
जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली, तेव्हा लोक माझ्याकडे पाहून हसत होते. निवडणुकीत भाग घेऊन मला हे सिद्ध करायचे होते की, सामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो. निवडणुकीत प्रत्येकाला जिंकायचे असते; पण मला हरण्यातच आनंद वाटतो. माझ्यासमोर कोणता उमेदवार आहे, याने मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझा पराभव सुरू ठेवायचा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत निवडणूक लढवत राहणार आहे. मी जिंकलो, तर मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे पद्मराजन सांगतात.
कोण आहेत के. पद्मराजन
टायरचे दुकान चालवणारे पद्मराजन होमिओपॅथी उपचारही देतात. याशिवाय ते एका स्थानिक माध्यमासाठी संपादक म्हणूनही काम करतात. पद्मराजन यांचे वय आता 65 वर्षे आहे. पद्मराजन हे टायरच्या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी 1988 मध्ये तमिळनाडूतील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. पीव्ही नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या बड्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आहे. या वेळी ते तमिळनाडूतील धर्मापुरीमधून निवडणूक लढवत आहेत.
गेल्या 30 वर्षांत त्यांनी नामांकनाच्या नावावर 1 कोटींहून अधिक खर्च केला आहे. पद्मराजन यांना निवडणूक लढवण्याचा छंद किती दिवस सुरू ठेवता येईल, याची चिंता आहे. निवडणूक लढवण्यासाठी 25 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागते. किमान 16 टक्के मते मिळाल्यानंतरच सुरक्षा ठेव परत केली जाते. पद्मराजन प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जाच्या नोंदीही ठेवतात. आतापर्यंत त्यांना निवडणुकीत मासे, टेलिफोन, टोपी, अंगठी अशी निवडणूक चिन्हे मिळाली आहेत. या निवडणुकीत त्यांचे चिन्ह टायर आहे.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असेही रेकॉर्ड
पद्मराजन यांनी भारतातील सर्वांत अयशस्वी उमेदवार म्हणून आपले स्थान मिळवले आहे. त्यांनी कोणतीही निवडणूक जिंकली नसली, तरी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book of Records) त्यांचे नाव नक्कीच नोंदवले आहे. पद्मराजन यांची त्यांच्या निवडणूक कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी 2011 मध्ये होती, जेव्हा त्यांनी मेत्तूर विधानसभेतून निवडणूक लढवली आणि त्यांना 6,273 मते मिळाली. मात्र त्या वेळी विजेत्याला 75 हजारांहून अधिक मते मिळाली होती.
याविषयी पद्मराजन म्हणाले की, मला एका मताचीही अपेक्षा नव्हती. पण लोक मला स्वीकारत असल्याचे यातून दिसून आले. (Election King Padmarajan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community