राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र ठरलेल्या) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यानुसार, २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी ३० जानेवारी २०२३ ला होईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
( हेही वाचा : खऱ्या शिवसेनेच्या सोबतीने मुंबई पालिकेवर भगवा फडकवणार – फडणवीस)
प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने पूर्ण करुन, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका घेण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले.
त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने मंगळवारी निवडणूक कायक्रम जाहीर केला. बाजार समितीच्या निवडणुकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना देण्यात आले आहेत.
निवडणूक कार्यक्रम असा…
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झाल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश दिले.
त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community