तुल्यबळ उमेदवाराला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधी उमेदवार विविध पर्यायांचा अवलंब करताना दिसतात. पण, पुणे सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) निवडणुकीत एक अजब प्रकार समोर आला आहे. तिसरे अपत्य नसतानाही ग्रामसेवकाने बोगस दाखला दिल्यामुळे एक उमेदवार अपात्र ठरला आहे. विशेष म्हणजे तो दूध संघाचा माजी संचालक होता. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे.
पुणे सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) निवडणुकीत हा प्रकार घडला. तीन अपत्य असल्याच्या कारणावरून तत्कालीन संचालक संदीप जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. वस्तुस्थिती पाहता जगदाळे यांना दोनच अपत्ये आहेत. याबद्दल त्यांनी हरकत घेतल्यानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषदेमार्फत या प्रकरणाची चौकशी केली.
( हेही वाचा: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता 29 नोव्हेंबरला )
जगदाळे यांना तीन अपत्य असल्याचा बनावट दाखला भोर तालुक्यातील जोगवडीच्या ग्रामसेवकाने दिल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामसेवक अशोक दंडवते यांना निलंबित केले. सारखे नाव असल्याचा फायदा घेत या ग्रामसेवकाने दाखल्याच्या नोंदीत खाडाखोड आणि फेरफार करून सदोष दाखला दिल्याचे आता समोर आले आहे.
निवडणूक झाली बिनविरोध
ग्रामसेवकाने तीन अपत्ये असल्याचा बोगस दाखला दिल्यामुळे जिल्हा दूध संघाचे तत्कालीन संचालक संदीप जगदाळे हे निवडणुकीत अपात्र ठरले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित केले.
Join Our WhatsApp Community