देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 5 राज्यांमध्ये निवडणूक प्रचार सभा आणि रोड-शो वरील बंदी कायम ठेवण्यात आली. यापूर्वी 15 जानेवारीपर्यंत असलेली बंदी 22 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता 31 जानेवारीपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
घरोघरी प्रचारासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
देशातील पंजाब, उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम गेल्या 8 जानेवारी रोजी घोषित करण्यात आला होता. त्यासोबतच निवडणुकीदरम्यान प्रचारसभा आणि रोड-शो वर 15 जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी 22 तारखेपर्यंत वाढवण्यात आली. आता आगामी 31 जानेवारीपर्यंत ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने घरोघरी प्रचारासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता घरोघरी प्रचारात पाचऐवजी 10 जणांना सहभागी होता येणार आहे. सर्व संबंधितांशी चर्चा करून निवडणूक रॅली, रोड शो यांच्यावरील बंदी वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचे मानले जात आहे.
(हेही वाचा अमित ठाकरे : मनसे नेते पदाची द्वितीय वर्षपूर्ती, संवेदनशील नेतृत्वाची!)
1 फेब्रुवारीपासून मोर्चे शिथिल करण्यात आले
तसेच, निवडणूक आयोगाने 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील जागांवर सभा घेण्यास परवानगी दिली आहे. तर दुस-या टप्प्यात ज्या विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणीही 1 फेब्रुवारीपासून मोर्चे शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ व्हॅनलाही परवानगी देण्यात आली आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर मणिपूरमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहे. आगामी 14 फेब्रुवारी रोजी गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला पहिले मतदान होणार होते, ते आता 20 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आले आहे. संत रविदास जयंतीनिमित्त पंजाबमधील विधानसभा निवडणुकीची तारीख वाढवण्याची विनंती विविध राज्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख वाढवली आहे.