एसटीच्या जीवावर सुरु आहे रोजगार हमी योजना!

70

ज्या महाराष्ट्राने रोजगार हमी योजनेचा पाया रचला, ज्यामुळे हजारो गरिबांना रोजगार मिळाला, त्या योजनेची सुरुवात एसटीच्या पैशाने झाली, हे फारच कमी जणांना ठाऊक असेल. आज त्याच एसटीची आर्थिक वाताहात झाली आहे. त्याच एसटीतील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी हात पसरावे लागत आहे, ही एसटीसाठी मोठी शोकांतिका आहे. ही रोजगार हमी योजना नंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००५ साली देशपातळीवर राबवली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी या नावाने देशभरातील लाखो गोरगरिबांच्या हाताला काम मिळाले.

वि.स. पागे यांची संकल्पना 

महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन सभापती वि.स. पागे घरात एकांतात बसले, तेव्हा त्यांच्या शेतात राबणाऱ्या कामगारांचा विचार करू लागले. ७०० रुपये बाजूला काढून ठेवले तर २० कामगार आपल्या शेतात सलग १५-२० दिवस राबू शकतात, असे गणित करत असतानाच त्यांनी हेच सूत्र राज्यासाठी मांडले आणि अजिबात वेळ न दवडता लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पत्र लिहिले. १०० कोटी महिन्याला बाजूला काढून ठेवले तर राज्यातील किती गरिबांच्या हाताला काम मिळेल, अशी विचारणा केली. या एका ओळीच्या पत्राचा मतितार्थ वसंतराव नाईक यांना कळाला आणि रोजगार हमी योजनेचा उदय झाला.

(हेही वाचा : अनिल परबांनी एसटी कर्मचा-यांना ‘हे’ दिले आश्वासन)

रोहयोसाठी एसटीचा पैसा 

योजनेची संकल्पना मांडली खरी पण त्यासाठी १०० कोटी उभे करणे हे मोठे आव्हान सरकारसमोर होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी यासाठी पागे यांनाच नेमले. रोजगार हमी परिषद स्थापन करून अध्यक्षपदी पागे यांची नियुक्ती केली. बैठकांच्या मागे बैठका घेतल्या. आणि शेवटी १०० कोटी एसटीकडून घ्यायचे ठरले. त्यानुसार एसटीच्या तिकिटावर १५ पैसे अधिभार लावण्यात आला. त्या १५ पैशातून रोजगार हमी योजनेसाठी १३८ कोटी जमवण्यात आले आणि त्यातून १९७१ मध्ये रोहयो अस्तित्वात आली. या योजनेचा राष्ट्रीय पातळीवर स्वीकार करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही योजना राष्ट्रीय पातळीवर लागू केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी या नावाने देशपातळीवर लागू झाली.

दुष्काळातही जगवले

पुढे १९७२ मध्ये महाराष्ट्राला दुष्काळाने ग्रासले. अन्नधान्य अभावी उपासमार सुरु झाली. बेकारी वाढली, गरिबांना हाताला काम राहिले नाही, त्याकाळात रोहयोमुळे महाराष्ट्र जगला. त्याही काळात एसटीच्या पैशावर हजारो गरिबांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळाला.

एसटीची वाताहत 

हजारो गरिबांच्या हाताला काम देणाऱ्या एसटीची आज मात्र आर्थिक कुचंबना सुरु आहे. इतरांना साहाय्य करता करता एसटी असहाय्य बनली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी एसटीकडे पैसे उरले नाहीत. त्यामुळे एसटीचे कर्मचारी गळफास घेऊन, विष पिऊन जीवन संपवत आहेत. याहून दुसरी शोकांतिका एसटीसाठी दुसरी नाही. सरकारी योजनांसाठी पैसा पुरवणाऱ्या एसटीला सरकारमध्ये सामावून घेण्यास सरकार तयार नाही, हे दुर्दैव एसटी कर्मचाऱ्यांच्या नशिबी आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.