राज्यातील राजकारणात सध्या ईडीच्या कारवायांनी सगळ्या घोटाळेबाजांना पळता भुई करून सोडले आहे. गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पहाटे ईडीने धाड टाकली. त्यानंतर त्यांची चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलं. मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्याखाली सध्या ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक हे चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे आता ईडीने मलिकांच्या घरातील सदस्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये त्याचा मुलगा फराझ मलिक आता ईडीच्या रडारवर आहे.
(हेही वाचा – कॅलेंडर संपलं तरी आरक्षण मिळेना, ओबीसी आरक्षणाला पुन्हा नवी तारीख)
फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येणार?
सध्या नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकर हिला कुर्ला भूखंड हडप करण्यात आणि नंतर तो खरेदी करण्यात मदत केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली आहे. परंतु, त्यांनी तपासात सहकार्य न केल्याने त्यांचे कुटुंबीयही तपासाच्या कचाट्यात सापडले आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक आता ईडीच्या रडावर आहे. ज्याला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
जमीन खरेदीत फराजचे नाव
मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिकने 2005 मध्ये दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार वली खानची कुर्ल्यात 3 एकर जमीन अवघ्या 30 लाख रुपयांना विकत घेतली होती. या जमिनीच्या कागदपत्रांवर सरदार वली खान यांच्या वतीने सलीम पटेल आणि नवाब मलिक यांच्या वतीने त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी स्वाक्षरी केली होती.
मलिकांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज
सक्त वसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना 25 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.