कमला इमारत आग प्रकरण: आदित्य ठाकरेंसह महापौरांची घटनास्थळाला भेट, काय म्हणाले महापौर…

73

मुंबईच्या नाना चौक भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली, तसेच अग्निशमन दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, उप महापौर अँड. सुहास वाडकर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, माजी नगरसेवक  अरुण दुधवडकर, “डी” विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

६ जणांचा मृत्यू

या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून, या घटनेत ३० जण जखमी झाले आहे. तर तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझली असून, आग विझविण्यासाठी १३ फायर इंजिन व ७ जंम्बो टॅंकरचा वापर करण्यात आला.

आगीची घटना ही दुर्दैवी

प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आगीची घटना ही दुर्दैवी असून, इमारतीमधील रहिवाश्यांसोबत केलेल्या चर्चेप्रमाणे धुरामुळे नागरिकांना जास्त त्रास झाला. आगीमुळे खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा अग्निशमन विभागाच्या ऑडिटनंतर पूर्ववत करण्यात येणार आहे. आग लागल्यानंतर, आग कशा
पद्धतीने वीझवावी, यावेळी कसे काम केले पाहिजे याचे नागरिकांना बृहन्मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: भारत विरोधी गरळ ओकणाऱ्या पाकड्यांना भारतानं घडवली अशी अदद्ल!)

आग विझवण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, आगीची घटना दुर्देैवी असून, आग लागल्यानंतर तत्काळ घटनास्थळावर महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचले होते. जितक्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाले तितक्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या टीमनेसुद्धा बऱ्याच नागरिकांना इमारतीबाहेर काढण्याचे काम केले. नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली त्यांना धीर दिला. आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वीजपुरवठा करणारी यंत्रणा ही सहा महिन्यातून एकदा तपासली गेली पाहिजे. त्यासोबतच आठवड्यातून शनिवार व रविवारला उंच इमारतीमधील नागरिकांचे विविध गट तयार करून, त्यांना अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.