मंडळी आपण एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तेव्हा आपण ती व्यक्ती कोण आहे, तीचं नाव काय, ती करते काय? याची थोडीफार माहिती तरी आपल्याला असते. पण आता साक्षात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे राज्याच्या विधानसभेला अध्यक्ष असतात की सभापती, तेच चक्क विसरले. रामराजे नाईक-निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. पण आदित्य ठाकरेंनी त्यांना ट्विटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख विधानसभेचे सभापती असा केला आहे. त्यामुळे त्यांचं नागरिकशास्त्र कच्चं असल्याचं म्हणत, नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
काय घडले नेमके?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा ८ एप्रिल रोजी वाढदिवस होता. दिवसभर ट्विटर आणि इतर समाज माध्यमांतून राज्याच्या नेतेमंडळींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यांना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख विधान परिषदेचे सभापती असा न करता, विधानसभेचे सभापती असा केला. मुळात विधानसभेचे अध्यक्ष असतात आणि विधान परिषदेचे सभापती असतात, याचा विसर माननीय आदित्यजींना पडलेला दिसतो. इतकी मोठी (घोड)चूक त्यांच्याकडून कशी झाली, हे मात्र काही कळू शकलेले नाही. आता ही ‘चूक’ होती की, ‘चुकून’ हे झालं? पण शेवटी चूक ही चूकच. आणि चुकीला माफी नाही… त्यामुळे त्यांच्या या एका चुकीमुळे ट्विटक-यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. मंत्र्यांकडूनच अशी चूक होत असेल, तर राज्याचा कारभार कसा होणार, अशा शब्दांत ट्वीटक-यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
(हेही वाचाः विकेंड लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद? वाचा आणि कन्फ्यूजन दूर करा!)
असे आहे आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
विधानसभेचे सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास दीर्घायुरारोग्य लाभो… अशा शुभेच्छा आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.
https://twitter.com/AUThackeray/status/1380065925903261698?s=20
काय आहे अध्यक्ष पदाची स्थिती?
विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक न झाल्याने, सध्या हे पद रिक्त आहे. नरहरी झिरवळ हे सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.
Join Our WhatsApp Community